गरजूंना ‘सक्षम’चा मायेचा हात.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सातत्याच्या लाॅकडाऊनमुळे इतरांप्रमाणेच भाजी विक्रेते यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणच्या दुर्गम ग्रामीण भागातील लोकांना जीवनावश्यक साहित्य मिळणे देखील कठीण झाले होते अशा भाजी विक्रेते आणि गरजू लोकांना सक्षम मेडिकल आणि एज्युकेशन ट्रस्ट यांचेवतीने दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारे जीवनावश्यक वस्तुंचे कीट देवून त्यांच्यावर मायेचा हात फिरवला आहे. 

अडूळ येथील सक्षम मेडिकल आणि एज्युकेशन ट्रस्ट यांच्यावतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यातील किरकोळ भाजी विक्रेते तसेच सडा वाघापूर, जुळेवाडी, निकमवाडी, डाकेवाडी (काळगांव), आडूळ गावठाण येथील कातकरी समाजाची वस्तीतील लोकांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट दिले आहे. या कीटमध्ये 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, चणा डाळ, मसूर डाळ, तुर डाळ, पोहे, तेलाची पिशवी असे साहित्य असून अशी 200 पेक्षा जास्त कीटचे वाटप संजय शिर्के व त्यांचे सहकारी यांनी केले आहे.

यापूर्वी सक्षम मेडिकल आणि एज्युकेशन ट्रस्ट ने गरजूंना ब्लॅंकेट वाटप, मोफत शालेय साहित्य वाटप, 10 वी 12 वी तील गुणवंत विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून सन्मान केला आहे. तसेच आणे येथील स्मशानभूमीसाठी आर्थिक निधी दिला आहे. 

सक्षम ट्रस्टच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे. सदर कीट वाटपप्रसंगी संजय शिकॅें ,शिवाजी शिर्के, सचिन शिर्के,  मनोज शिर्के, धनाजी केंडे डि के,व ईतर उपस्थित होते. ‘सक्षम’ च्या या आपुलकीच्या वागणुकीमुळे गरजू तसेच भाजी विक्रेते भारावून गेले.

गरजूंना मदत केल्याचे समाधान वाटले :
भाजी विक्रेत्यांना मदत करण्यासाठी सक्षम ट्रस्टच्या माध्यमातून ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून जीवनावश्यक कीट दिले आहे. असे मत सक्षम ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संजय शिर्के यांनी व्यक्त केले आहे.