मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : बहुतेक होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे दिसत असल्याने आता राज्यात यापुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवता येणार नाही,अशा रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये भरती केले जाणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १८ जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली.
त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं केल्याने सौम्य लक्षणेअसलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असे टोपे यांनी सांगितले
लसीकरणासाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले होते. त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगतानाच केंद्र सरकारने लसी आयात कराव्यात आणि राज्यांना पुरवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यासाठी लागणाऱ्या लसीचे पैसे द्यायलाही राज्य तयार आहे, असेही ते म्हणाले. राज्यात म्युकर मायकोसिसचे २२४५ रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने त्याला नोटीफाईड आजार घोषित केलं आहे. रुग्ण आणि त्याबाबतची माहिती शासनाला देणे रुग्णालयांना बंधनकारक आहे. या आजारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन औषधाचे नियंत्रण केंद्राकडे आहे. केंद्र सरकारने औषध दिल्यावर आपण त्याचे प्रत्येक जिल्ह्यात वाटप करतो. त्यामुळे रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या आजारावर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच या आजारावरील उपचारासाठी १३० रुग्णालये निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच सध्या २२०० रुग्णांपैकी १००७ रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.