पाटण मध्ये लसीकरणाचा गोंधळ ; लसीकरणासाठी परजिल्ह्यातील लोकांची तोबा गर्दी.

 ग्रामीण रुग्णालयासमोर लसीकरणासाठी परगावाहून आलेल्या नागरिकांच्या वाहनांची रांग (छायाचित्र : गजानन पोतदार, पाटण)

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

शासनाकडून वय वर्ष १८ ते ४४ च्या दरम्यान नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करून लस देण्यात येत आहे. मात्र सॉफ्टवेअरमधील काही तांत्रिक चुकीमुळे तालुक्याबाहेरील मुंबई, पुणे, सांगली, इचलकरंजीसह सातारा, कोरेगाव, कराड, महाबळेश्वर येथील नागरिकांना पाटण ग्रामीण रुग्णालयामध्ये लस घेण्यासाठी केंद्र मिळाल्याने पाटण ग्रामीण रुग्णालयामध्ये लस घेण्यासाठी तोबा गर्दी होत आहे.

दरम्यान, तालुक्याबाहेरील नागरिक लस घेण्यासाठी पाटणमध्ये गर्दी करत असल्याने तालुक्यात कोरोना वाढीचे कारण ठरून आतापर्यंत पाटणच्या प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामावर पाणी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित रहात आहेत. मात्र तालुक्याच्या वाट्याची लस ही बाहेरील तालुक्यातील नागरिकांना जात असल्याने तालुक्यातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तसा कमीच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे पाटण येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, पोलीस निरीक्षक निंगराज चौखंडे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्यासह त्या त्या विभागातील कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि २४ तास ऑनड्युटीमुळे पाटण तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग कमी आहे. तालुक्यात कोरोना नियमांचे कठोर पालन होत असल्याने शहरी भागाप्रमाणे म्हणावा तसा पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही याचे समाधान आहे. याचे सर्व श्रेय हे तालुक्याच्या प्रशासनालाच जाते. 

पाटण ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील तालुक्याबाहेरील नागरिकांची शनिवार पासून मंगळवारपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रुग्णालयाबाहेर गाड्यांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असून शहराचा पिनकोड टाकावा लागत असूनही तालुक्या बाहेरील नागरिकांना पाटण हे ठिकाण कसे मिळत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लसीकरण करत असताना संबंधित तालुक्याबाहेरील व्यक्तींची खऱ्या अर्थाने कोरोना टेस्ट केल्यानंतरच त्यांना लसीकरण देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्याच्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्यास, त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात असून यामुळे तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटणच्या प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामावर पाणी पडण्याची भीती जाणकार नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर वय १८ च्या पुढील प्रत्येक नागरिकांना आपल्या तालुक्यातच कोरोनाची लस मिळावी, जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही, अशा प्रतिक्रियाही सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.
____________________________________

नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करावी

ऑनलाइन नोंदणीमुळे पाटणच्या स्थानिक नागरिकांना लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे हे निदर्शनास आले आहे. स्थानिकांना प्राधान्याने लसीकरण झाले पाहिजे. त्यासाठी तालुक्यात पाटण, मल्हारपेठ, ढेबेवाडी, तारळे या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू करता येईल का? यासाठी आम्ही विचाराधीन आहोत. याचा फायदा पाटण तालुक्यातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणीसाठी होईल.

योगेश टोम्पे, 
तहसीलदार, पाटण
____________________________________

प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच लस मिळावी

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी असल्याने तालुक्याबाहेरील नागरिकांची पाटणमध्ये गर्दी होत आहे. त्यांच्याकडून स्थानिक नागरिकांना व ग्रामीण रुग्णालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. बाहेरून येणाऱ्यांची कोविड टेस्ट पाहूनच त्यांना लस द्यावी. प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच लस मिळावी तसेच तालुक्याच्या वाट्याची लस ही तालुक्यातील नागरिकांनाच मिळावी.

फत्तेसिंह पाटणकर,
 जिल्हा संयोजक, भाजप प्रज्ञा आघाडी
____________________________________