शेतकऱ्यांनी काळानुरुप बदलावे : खा.श्रीनिवास पाटील

 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

      वातावरणातील बदल व बाजारपेठेतील मागणीनुसार शेती उत्पादन घेतले गेले पाहिजे. त्यासाठी बदलत्या काळानुसार शेतक-यांनी आपल्या कार्यप्रणालीत बदल घडवून आणला पाहिजे असे मत खा. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

     कराड येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन बियाणाची पैदासकार ते पायाभूत, पायाभूत ते प्रमाणित व सत्यप्रत बियाणे अशी बियाणे साळखी विकसित करणे, त्याची विक्री करणे या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

    खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, शेतक-यांनी गट तयार करून पुढाकाराने स्वतःचे बियाणे स्वतः तयार करावे. त्या बियाण्यांची इतरांना विक्री करून जास्तीत जास्त मोबदला मिळवावा. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना योग्य आणि माफक दरात खात्रीशीर उगविण्याची क्षमता असलेले बियाणे उपलब्ध करून द्यावे. हा कार्यक्रम केवळ विक्री शुभारंभ नसून शेतकऱ्यांनी काळाप्रमाणे स्वताला बदलले पाहिजे. त्यासाठी आधुनिक माहिती मिळवून पारंपरिक शेतीत बदल केला पाहिजे. तेव्हाच आपला शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द होईल. बियाण्यांच्या बाबतीत साताऱ्याचा ब्रॅंड विकसित करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून निर्मित कंपन्यांनी तयार केलेल्या सत्यप्रत बियाणांच्या विक्रीचा शुभारंभ खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

     पेरले येथील शेतकऱ्यांच्या स्वयंसहाय्यता गटातून निर्मित झालेल्या पी.जी. भोसले फार्म प्रोड्युसर कंपनीने 228 फुले कल्याणी या सोयाबीन बियाणाची निर्मिती केली आहे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून पैदासकार बियाणे घेण्यात आले होते. त्याची पेरणी करण्यात आल्यानंतर उगवून आलेल्या बियाणांतून पायाभूत बियाणांची निवड करण्यात आली. पायाभूत निवडलेले बियाणे योग्य तपासणी करून प्रमाणित करण्यात आले. त्यानंतरच सत्यप्रत बियाणांची निर्मिती झाली. या बियाणाच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला.

     याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, सारंग पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, उंब्रज मंडल कृषी अधिकारी रवी सुरवसे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र चव्हाण, कृषी सहाय्यक सतीश रणपिसे, विजयसिंह भोसले, तानाजी जाधव, अनुराग भोसले, विनोद सुर्यवंशी, विक्रम जाधव आदींची उपस्थिती होती.