नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळवून द्या : खा. श्रीनिवास पाटील यांच्या सुचना.

 कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या कराड व पाटण तालुक्यातील चचेगाव, येणके व चाळकेवाडी या नुकसानग्रस्त ठिकाणी खा. श्रीनिवास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून बाधितांना मदत मिळवून द्यावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

तौक्ते चक्रीवादळाचा सातारा जिल्ह्याला फटका बसला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांनी बुधवारी वादळामुळे नुकसान झालेल्या कराड, पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. चचेगाव येथे वादळी पावसाने केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. सामुहिक शेती करणारे शेतकरी हनुमंत हुलवान, साहेबराव पवार, विलास पवार यांची केळीची बाग अक्षरशः भुईसपाट झाली आहे. सदर शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून फुलवलेली व हातातोंडाशी आलेली बाग बघताबघता हातातून गेली आहे. नुकसानीमुळे सदरचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर बाग व शेतकऱ्यांची अवस्था पाहून खा. श्रीनिवास पाटील हे देखील गहिवरून गेले. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांच्या समोर असणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी उपस्थित असलेले कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना मदत मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भरणे हे देखील यावेळी उपस्थित होते.



तसेच येणके येथील सतीश गुरव यांच्या घराच्या भिंतीला वादळामुळे तडे गेले आहेत. त्याची सुद्धा पाहणी खा. पाटील यांनी केली. यावेळी सरपंच निकहत मोमीन, पोलीस पाटील प्रदीप गरुड, ग्रामसेवक रोहिणी जानकर उपस्थित होत्या. त्यानंतर चाळकेवाडी (ता. पाटण) येथील विठ्ठल चाळके यांच्या राहत्या घरावरील पत्रा वादळी वाऱ्यामुळे उडून गेला आहे. त्या ठिकाणचीही पाहणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केली. यावेळी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, संजय देसाई, मारुती मोळावडे व सरपंच सौ. नंदा चाळके उपस्थित होत्या.

दरम्यान तौक्ते वादळामुळे सातारा जिल्ह्यातील शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देणार असल्याचे खा. श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.