बनपुरी गाव झाले कोरोनाचे हॉटस्पॉट.

 


तळमावले | राजेंद्र पूजारी :

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील बनपुरी हे गाव गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून सर्वत्र चर्चेत आले ते कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून. सर्वप्रथम या गावातच कोरोनाचा शिरकाव झाला. व अनेकजण कोरोना बाधित झाले.

  दुसऱ्या लाटेतही गतवर्षी प्रमाणे या बनपुरी गावातच कोरोनाचा शिरकाव झाला व व हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट होताना दिसून येत आहे. दोन आठवड्यापासून बाधित रुग्णांचा आकडा कमालीचा वाढत आहे. आतापर्यंत येथील तीन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे तर बाधित रुग्णसंख्या ने शंभरी गाठली आहे .तर एकाच दिवसात नवा उच्चांक गाठला व नवीन 24 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. सध्या गावात 70 बाधित रुग्ण आढळले त्यापैकी 30 हून अधिक रुग्ण येथील कंकवाडीतील आहेत. कंकवाडी म्हणजे 125 लोकसंख्या असलेली वस्ती यामध्ये कोरोनाचा जणु कहरच झाला.येथे एकाच घरातील पंधरा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. गावातील लोकांनी कोरोना प्रतिबंध नियमाचे पालन न केल्याने व त्यांच्या निष्काळजीमुळे गावात कोरोनाचा फैलाव वाढला.  



  खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. जनजागृती करणे, सॅनिटायझर फवारणी, सर्वेक्षण, तपासण्या युद्धपातळीवर सुरू आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत . लोकांनी नियमाचे पालन करावे विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.