नगरसेविका निधी शिंदे यांच्या पुढाकाराने चेंबूरमध्ये लसीकरण केंद्राचा शुभारंभ .


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  राज्यात लसीकरणाविषयीची उत्सुकता वाढलेली असून लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. मात्र, ही लस मिळेल की नाही, अशी भीती त्यांच्या मनात आहे, ती त्यांनी दूर करावी कारण महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करण्यावर राज्य शासन भर देत आहे, अशी माहिती उपनगरचे पालकमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. नगरसेविका निधी प्रमोद शिंदे यांच्या पुढाकाराने चेंबूरमधील प्रभाग १४८ येथे उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. 

यावेळी शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी राज्य शासन तसेच पालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल तसेच सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रभाग १४८ हा रिफायनरी प्रकल्पांलगतचा भाग असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांचे लसीकरण व्हावे, यासाठी घरोघरी जावून नोंदणी करणे आणि लसीच्या उपलब्ध साठ्यानुसार, तेवढ्याच नागरिकांना फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात बोलावून लसीकरण करण्याचे नियोजन सुयोग्य पद्धतीने सुरु आहे. गरजेनुसार नागरिकांना लसीकरण केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्थादेखील उपलब्ध करून दिली जात असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

गेल्या वर्षभरापासून प्रभाग क्रमांक १४८ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आपण जनजागृती करत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे या भागात कोरोना आटोक्यात आला आहे. अन्य प्रभागांच्या तुलनेत इथे काही सुविधांचा अभाव असला तरी तळागाळातील नागरिकांमध्ये संपर्क तसेच समन्वय ठेवला आहे. म्हणूनच कोरोनाचा फैलाव झाला नाही. बाहेरच्या भागाप्रमाणेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री तसेच महापौर यांच्यावतीने जनतेला करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन केले जात असल्याचे नगरसेविका निधी शिंदे यांनी सांगितले. व्हिडिओकॉन अतिथी येथे सुरु झालेल्या या लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर परिसरातील नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, खासदार राहुल शेवाळे, शिवसेना विभागप्रमुख मंगेश सातमकर, शाखाप्रमुख हेमाकांत म्हात्रे , महिला शाखाप्रमुख दक्षता पाताडे सहाय्यक पालिका आयुक्त हेर्लेकर, प्रमोद कोकमकर व विजय सागवेकर उपस्थित होते.