एका शिक्षकाची घराची वास्तुशांत विधी अनोख्या पद्धतीने. संविधानाचे वाचन करून पुरोगामी आणि वैज्ञानिक पद्धतीने गृहप्रवेश.


उंडाळे.. वास्तूशांत समारंभासाठी मांडलेली पूजा. छायाचित्र जगन्नाथ माळी

उंडाळे | जगन्नाथ माळी                              

जुन्या परंपरेला फाटा देत, भारतीय संविधानाचे वाचन करून पुरोगामी आणि वैज्ञानिक पद्धतीने गृह प्रवेश करत उंडाळे येथील प्राथमिक शिक्षक सुहास महादेव पाटील यांनी "क्रांतीबन" या नव्या बंगल्याचा वास्तुशांत विधी अनोख्या पद्धतीने पार पडला. त्यांच्या या अभिनव सामाजिक कल्पकतेचे परिसरातून कौतुक होत आहे.                             याबाबत अधिक माहिती अशी,उंडाळे येथील प्राथमिक शिक्षक सुहास महादेव पाटील सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असतात. अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण, वनवा विरोधी मोहीम, जटा निर्मूलन, ग्रंथ चळवळ असे अनेक समाजोपयोगी उपक्रम ते सतत राबवत असतात. येथील क्रांती ग्रुपच्या माध्यमातून युवकांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन, ग्रंथालयाचे संवर्धन, काव्यवाचन स्पर्धा, गणेशोत्सवात समाज जागृतीचे उपक्रम राबवत त्यांनी आपला समाज परिवर्तनाचा लढा अखंड सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर शिक्षक म्हणून काम करत आपले ज्ञानदानाचे कार्य ही सुरु आहे. 

शिवम प्रतिष्ठान चे डॉ. इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांच्या उच्च करियर साठी हे त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. अशा प्रकारे समाजपरिवर्तनासाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्री पाटील गुरुजींनी नुकतेच घर बांधले. घराचे बांधकाम पूर्ण होताच त्यांनी त्यांच्या सामाजिक विचारसरणीप्रमाणे क्रांतीबन असे आपल्या बंगल्याचे नामकरण केले. या घराचा वास्तुशांत समारंभ पारंपारिक पद्धतीने न करता त्यावरील अनाठायी खर्च टाळून पैसा विविध सामाजिक संस्थांना मदत म्हणून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.यानुसार धार्मिक विधी ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील.यांच्या प्रतिमा व पुस्तके यांची पूजा मांडण्यात आली. माती, बियाणे, वृक्ष, यांचे पूजन करून वास्तुशांत समारंभ करण्यात आला. भारतीय संविधानाचे वाचन करुन गृह प्रवेश केला. 

यावेळी डॉ. सुधीर कुंभार, माजी प्राचार्य बी. पी मिरजकर, धनंजय पवार, सुहास प्रभावळे , महादेव पाटील, सौ. सुप्रिया पाटील, सौ. सारिका पाटील, सुनिल पाटील, अवधूत व सुयश व कुटुंबिय यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती वास्तुशांत समारंभाचा खर्च होणाऱ्या पैशातून दहा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे दहा हजार रुपये मदत करण्यात आली. तसेच पाच विद्यार्थी शाळेसाठी दत्तक घेतले आहेत. अशा प्रकारे जुन्या रुढी परंपरेला फाटा देत समाजपरिवर्तनाचा संदेश देणारा हा आगळावेगळा वास्तुशांत समारंभ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.