माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकांबाहेर आंदोलन

 

स्टेशन प्रबंधकांना निवेदन सादर करताना माथाडी कामगार पदाधिकारी पोपटराव देशमुख व इतर.

मुंबई-  माथाडी कामगार अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वे, बस आणि एसटी (सार्वजनिक वाहतूक )बसने प्रवास करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी काल सकाळी मशिदबंदर, डॉकयार्ड रोड, रे रोड, कुर्ला, मानखुर्द, वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दादर, भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर,डहाणूसह अन्य रेल्वे स्टेशनबाहेर आंदोलन करून स्टेशन प्रबंधकांना निवेदन सादर केले. हे आंदोलन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनाची नियमावली आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत पर पडले.

राज्य सरकारने लाॅकडाऊन जाहीर केल्यापासून माथाडी कामगार आणि अन्य घटक बाजार समितीच्या आवारात नागरिकांच्या अन्न-धान्य, कांदा बटाटा, मसाले, भाजी व फळे, गॅस सिलिंडर या जीवनावश्यक मालाची आणि जनावरांचे खाद्य, पिकांचे खत, अन्य मालाची लोडिंग आणि अनलोडिंगची कामे जीव मुठीत घेऊन करत आहेत. मग या कष्टांची कामे करणाऱ्या घटकाला अत्यावश्यक सेवेत घेणे, त्यांना रेल्वेने आणि महापालिका बस आणि एसटी बसने प्रवास करण्यास परवानगी देणे तसेच त्यांना विमा संरक्षण कवच लागू करणे, या मागणीकडे महाराष्ट्र  सरकार का दुर्लक्ष करत आहे?. कष्टांची आणि अंगावरील स्वरुपात कामे करणाऱ्या माथाडी कामगारांना सरकारने न्याय द्यावा?,अशी मागणी माथाडी माथाडी कामगारांनी केली आहे.