मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : जैन समाजातील धर्मगुरू त्यांच्या कार्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर फिरत असतात. परंतु अशा गुरु आणि त्यांच्या अनुयायांकडे ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना कोरोनाची लस मिळू शकत नाही. त्यामुळे जैन मुनींना ओळख पत्राशिवाय लस द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात नुकतीच मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन जैन मुनी यांना कोरोना लस घेण्यास येत असलेल्या अडचणीकडे लक्ष वेधले. मुंबईत विविध धार्मियांचे गुरु आणि अनुयायी आहेत. विशेषतः जैन समाजाचे धर्मगुरू. त्यांच्या कार्यासाठी त्यांना मुंबई महाराष्ट्राबाहेर देखील फिरावे लागते. परंतु अशा गुरु किंवा अनुयायांकडे ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना कोरोनाची लस मिळू शकत नाही. अशा जैन मुनी आणि त्यांच्या अनुयायांना देखील लस मिळण्याकरिता व्यवस्था करावी अशी मागणी केल्याचे खा. सावंत यांनी सांगितले. आमच्या मागणीला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहितीही सावंत यांनी दिली.