दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली,आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराडला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांचे आढावा बैठक संपन्न.

 कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची आढावा बैठक कराड येथील विश्रामगृह येथे घेतली. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, उपजिल्हा रुग्णालय कराड चे अधीक्षक डॉ प्रकाश शिंदे आदींच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते यांच्यासह या बैठकीला मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी यावेळी उपस्थित होते. हि आढावा बैठक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने घेतली गेली होती. या बैठकीत आ. चव्हाण यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या केंद्रातील अडचणी समजून घेतल्या तसेच सद्य सुरु असलेले लसीकरण, कोरोना रुग्णांची तपासणी यांचा आढावा घेत कोरोना होऊन बरे झालेल्यांचे नोंदणी करून त्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी आ. चव्हाण यांनी सांगितले. यासाठी "पोस्ट कोविड" विभाग व्यवस्था प्रत्येक पी एच सी सेंटर मध्ये करणे आवश्यक असल्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या.

 तसेच आ. चव्हाण यांनी या मिटिंग मध्ये सर्व डॉक्टरांना पुढे सूचना दिल्या कि, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रकारे आरोग्य व्यवस्थेने काळजी घेतली होती ती यंत्रणा किंवा व्यवस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसली नाही कोरोना गेल्याचे समजून सर्व यंत्रणा शांत झाल्याने दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली ती अवस्था तिसऱ्या लाटेत होऊ नये यासाठी आधीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे आ. चव्हाण यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होत असल्याचे तत्ज्ञांचे मत आहे ते विचारात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज बेडची व वार्ड ची व्यवस्था करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यवस्था गरजेच्या आहेत तसेच ज्या गोष्टींची, यंत्रणेची आत्ता गरज जाणवली ती तिसऱ्या लाटेत उद्भवू नये यासाठी एक अहवाल व मागणी पत्र शासनाकडे तात्काळ पाठवावा अश्या सूचना आ. चव्हाण यांनी आजच्या आढावा बैठकीत दिल्या.