पाटणच्या कोव्हीड सेंटरला आणखी 50 ऑक्सिजन बेडची मंजुरी : ना. शंभूराज देसाई


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची ऑक्सीजनचे बेड अभावी गैरसोय होवू नये याकरीता पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सीजन बेड वाढविण्यास गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आवश्यक निधी मंजुर करुन दिला आहे. लवकरच या कामांस सुरुवात होत असून सध्या या केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सीजनचे बेड कार्यान्वीत आहेत. वाढवावयाच्या 50 ऑक्सीजन बेडच्या कामांची तसेच येथे कोरोना रुग्णांकरीता असणाऱ्या सुविधांची पहाणी आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना घेवून केली. यावेळी येथील 100 ऑक्सीजन बेडबरोबर इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता आवश्यक असणारा वाढीवचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याची ग्वाहीही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना दिली.

          दौलतनगर ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली दौलतनगर ता.पाटण येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उभारवयाच्या 10 व्हेन्टीलेटरच्या बेडच्या सुविधांसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदरच्या बैठकीनंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमधील वाढीवच्या 50 ऑक्सीजन बेडच्या कामांची पहाणी करण्याकरीता व इतर आरोग्य सुविधांचीही पहाणी करणेकरीता भेट दिली.

             यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.कुराडे,पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे आदींची उपस्थिती होती.

                   यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरीता ऑक्सीजन बेडची कमतरता भासू नये याकरीता दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 50 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत आहेत वाढीवचे 25 ऑक्सीजन बेडचे काम पुर्ण झाले आहे तसेच 10 व्हेन्टीलेटरच्या बेडची सुविधा येत्या आठ दिवसात आपण कार्यान्वीत करीत आहोत.तसेच पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत आहेत वाढीवचे 50 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत करण्याकरीता आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला आहे.त्याचे काम लवकर सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये 36 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत आहेत. पाटण तालुक्यात त्यामुळे एकूण 210 ते 215ऑक्सीजन बेड कार्यान्वीत होणार आहेत तर 10 व्हेन्टीलेटरचे बेड कार्यान्वीत करीत आहोत. दौलतनगर व पाटण येथील उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी दोन दोन ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येणार असून दौलतनगरला याचे कामही सुरु करण्यात आले आहेत.या तिन्ही उपचार केंद्राकरीता अतिरिक्त डॉक्टर, नर्सेस व स्टाफ आवश्यक आहे त्याप्रमाणे हा स्टाफ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी, सातारा यांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर आवश्यक असणारी सर्व औषधे ही उपलब्ध करुन देण्याचे आदेशही जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची कसलीही गैरसोय पाटण तालुक्यात होणार नाही याचे नियोजन तालुका प्रशासनाने करावे अशाही सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना दिल्या. तर पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोवीड केअर सेंटरमधील डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ यांना येथे रुग्णांना उपचार देताना काही अडचणी नाहीत ना? अशी विचारणा करुन तुम्हीही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या अशा सुचना येथील स्टाफला ना.देसाईंनी यावेळी केल्या.