अभिमानास्पद ; भारतीय नौदलातील साताऱ्याच्या सुपुत्राचं धाडसी कर्तुत्व, तुफान चक्रीवादळाचा सामना करत 186 मच्छिमारांना वाचवलं

 

लेफ्टनंट पायलट शिवम जाधव आपल्या आई, वडीलांसोबत

ढेबेवाडी | नितिन बेलागडे
           तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या १८६ मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात सणबूर ता. पाटण येथील सुपूत्र नौदल लेफ्टनंट पायलट शिवम विठ्ठल जाधव व नौदलातील सहकार्यानी मुंबई येथे समुद्र किनारपट्टीवर महत्वपूर्ण कामगिरी करत सणबूर गावच्या तसेच पाटण तालुक्याबरोबरच सातारा जिल्ह्याच्या शौर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 

          तौक्ते वादळ मुंबई येथे धडकताच ताशी १२० ते १४० वेगाने वारे वाहत होते. वादळामुळे समुद्रातील जहाजे व मच्छिमारांच्या नौका उलटल्या. मंगळवार दि. १८ मे रोजी सायंकाळी चक्रीवादळामुळे मुंबई येथील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक मच्छीमार भयानक वादळात अडकून पडले होते. तर काही जहाजावरील कर्मचारी भरकटल्याची खबर मुंबई येथील भारतीय नौदल अधिकार्‍यांना मिळाली. याच वेळी नौदलाचे लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांनी आपल्या नौदलातील सहकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा सामना करीत त्यांनी रेस्क्यू आँपरेशन चालु करून मदतकार्य सुरू केले. आय एन एस कोलकता या लढावु युद्ध नौकेवर लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांच्यासह तैनात असणाऱ्या जवानांनी प्राणाची तमा न बाळगता, येईल त्या प्रसंगाला तोंड देत जमेल त्या लोकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.यावेळी वादळात अडकलेल्या १८६ मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात जहाजावरील पायलट शिवम जाधव यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कामगिरीचे नौदल प्रमुखांनी व संरक्षणमंत्री यांनी कौतुक केले. या कामगिरीची ग्रामस्थांना माहिती मिळताच शिवमचे वडील विठ्ठल जाधव सर व आई संगिता जाधव यांचे शिवम बरोबरच कौतुक केले जात आहे.   

_____________________________________
शिवमने सातारा सैनिक मध्ये प्रवेश घेतल्यापासूनच एनडीए करण्याचे स्वप्न बाळगले, प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीने यश प्राप्त केले. नौदलात  लेफ्टनंट पायलट पदावर काम करताना जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविले. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.देशसेवा करताना अशीच चांगली कामगिरी त्याने करावी ही सदिच्छा अशी प्रतिक्रिया शिवमचे वडील विठ्ठल जाधव व आई संगिता जाधव यांनी दिली.  
_____________________________________