पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्णांना व्हेंटीलेटर बेडची कमतरता पडू नये याकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी म्हणून दौलतनगर ता.पाटण येथील कोवीड केअर सेंटरमध्ये स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 व्हेंटीलेटर बेड बसविले असून कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता आज या 10 व्हेंटीलेटर बेड लोकार्पण गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे समवेत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,जालंदर पाटील,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,डॉ.श्रीनिवास बर्गे, कोवीड केअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार,समन्वयक अमर कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गतवर्षी पाटण मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेत पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधितांना उपचार देणेकरीता जिल्हा नियोजन समिती, त्यांचे स्थानिक विकास निधी मधून पाटण, ढेबेवाडीसह दौलतनगर ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अद्यावत सोयी-सुविधांसह 50 ऑक्सिजन बेड व 25 नॉन ऑक्सिजन बेडचे कोरोना केअर सेंटर सुरु केले.आज याठिकाणी 50 ऑक्सिजन बेडमध्ये वाढ करुन एकूण 75 ऑक्सिजन बेड कार्यरत असून मतदारसंघातील कोरोना रुग्णांच्यावर उपचार होत आहेत.दुसऱ्या लाटेमध्ये कोरेानाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असल्याने कोरोना बाधित रुग्णांना व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता भासू लागल्यानंतर सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामध्ये कराड असो किंवा सातारा येथे व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे व्हेंटीलेटर बेडअभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेतला व या कोवीड केअर सेंटरमध्ये स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अद्यावत सोयी-सुविधांसह 10 व्हेंटीलेटर बेड बसविले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या शुभहस्ते याचा लोकार्पण झालेनंतर 10 व्हेंटीलेटर बेड आजपासूनच कोरोना रुग्णांना उपचाराकरीता खुले करण्यात आले आहेत.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,गेल्या सहा महिन्यात सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.अलीकडच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ ही चिंताजनक आहे.सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामध्ये कराड असो किंवा सातारा येथे व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. व्हेंटीलेटर न मिळाल्यामुळे काहींचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून आपण या कोवीड केअर सेटंरमध्ये व्हेंटीलेटर बेड बसविण्याचा निर्णय घेतला. या 10 व्हेंटीलेटर बेडमुळे व योग्य औषधोपचारामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.
दौलतनगर कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणेकरीता एक नोडल अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे 02 वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी,खाजगी सराव करणारे 16 डॉक्टर, 08 नर्स, 03 फार्मासिस्ट,04 वॉर्ड बॉय, ॲम्बूलन्सकरीता स्वतंत्र्य ड्रायव्हर, डेटा ऑपरेटर 01 अशाप्रकारे वैद्यकीय पथक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.सेंटरमध्ये तीन रुममध्ये 75 ऑक्सीजनचे बेड तर मध्यम हॉलमध्ये 10 व्हेंटीलेटर बेड ठेवण्यात आले आहेत. गिझर,100 लिटर शुद्ध पाणी,नवीन टॉयलेट तसेच येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था,कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करणेकरीता संगणक, प्रींटर, इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध केल्या असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.या केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नाष्ता, जेवण देण्यात येत आहे. 10 व्हेंटीलेटर बेडची यंत्रणा गौरव सर्जीकलचे गौरव परदेशी व चिंगळे सर्जीकलचे रोहित चिंगळे यांनी कार्यान्वीत केली आहे.