सातारा जिल्ह्यातील "या" गावाने घालून दिला शंभर टक्के लसीकरणाचा आदर्श.
मान्याचीवाडी येथील ग्रामस्थ लस घेतना सोबत आरोग्य कर्मचारी व मान्यवर.

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढणारी रुग्नसंख्या आणि लसीकरणाबाबत जनतेमध्ये उदासीनता असताना पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी या गावाने पात्र लाभार्थ्यांचे एकाच दिवशी शंभर टक्के लसीकरण करून वेगळा आदर्श घालून दिला. आरोग्य विभागाच्या मदतीने ग्रामपंचायतीने राबविलेल्या लसीकरण मोहीमेस पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी भेट दिली.  

      शासनाच्या माध्यमातून प्राथमीक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आदि ठिकाणी टप्प्याटप्प्याने कोवीड लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र अजूनही त्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही परिणामी रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे लसीकरणाबरोबरच शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने उपकेंद्रातूनही लस देण्याचे नियोजन केले. त्यासाठी ग्रामपंचायतींंच्या माध्यमातून ऑनलाईन रजीस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

      त्यानुसार मान्याचीवाडी गावातील पात्र लाभार्थ्यांना याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माहीती देऊन त्यांचे प्रबोधन केले. यासाठी आशा कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांनी ४५ वर्षे वयाच्या वरती असलेल्या लोकांचा सर्वे करुन त्यांचे रजीस्ट्रेशन केले. यासाठी सर्वच लाभार्थींंनी तयारी दर्शविली. त्यानुसार रविवारी सकाळी दहा वाजलेपासून गावातच लसीकरणाचा कॅम्प घेण्यात आला. मास्क आणि सोशल डिस्टंशिंगचा वापर करत गावातील१००% म्हणजेच ७२ लोकांनी कोवीडची लस घेतली. यासाठी सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.डी.जाधव, सरपंच रवींद्र माने, दादासो माने, ग्रामसेवक प्रसाद यादव , आरोग्य सेवक के.सी.तडवी, संदिप साळुंखे, सिध्दार्थ गवई, शंतनु पाटील, स्वप्नील सुतार, कांता बडे, मेघा मराठे, सुवर्णा माने आदिंनी यासाठी परिश्रम घेतले.

     मान्याचीवाडीने कोरोनाला रोकण्यासाठी ग्रामस्थांमध्ये अभय निर्माण करुन लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. याचा आदर्श घेऊन अन्य ग्रामपंचायतींंनी पुढाकार घ्यायला हवा. गावागावांत असा उठाव झाल्यास कोरोनाविरुध्दचा लढा यशस्वी होईल असे मत तहसिलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी व्यक्त केले.