" माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू" चे गीतकार हरेंद्र जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता… , माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू... अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांचे प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.निधनासमयी ते ८७ वर्षांचे होते.हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती.आज रात्री त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

हरेंद्र जाधव यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३३ रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता.हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. त्यावेळी जलसा मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले जात होते. जाधव यांनाही लिहिण्याची गोडी लागली आणि त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक बहारदार गाणी उतरली. वयाच्या १७ व्या वर्षीच त्यांनी पहिले गाणे लिहिले होते. मात्र, हे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली होती.हरेंद्र जाधव यांनी पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा… तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा… माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू… हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं… आता तरी देवा मला पावशील अशी तब्बल दहा हजारांवर गाणी लिहिली आहेत.