मालदन मधील युवक विजय काळेने फुलवली सेंद्रिय शेती.

पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देवून शेती प्रकल्पाची केली यशस्वी निर्मिती.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा व्यावहारिक जीवनात उपयोग करणारे तसे विरळच आहेत. मालदन मधील विजय काळे हा 27 वर्षाचा युवक शेती मध्ये विविध प्रयोग करण्याच्या ध्येयाने झपाटलेला आहे. स्वतःच्या शेतीमध्ये त्याने वेगवेगळे प्रयोग सुरु केले आहेत. विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी उत्तम पर्याय म्हणून ‘राॅयल गांडूळखत प्रकल्प’ तयार केला आहे. मोठया प्रमाणात गांडुळ खत निर्मिती, आणि सेंद्रीय शेती मधून मसाले गुळ निर्मिती करुन तो वार्षिक 4 ते 5 लाख रुपये कमवत आहे.

निसर्गाची आणि शेतीची आवड असलेल्या विजय काळे याने शालेय शिक्षणानंतर त्याच दृष्टीकोनातून आपले पुढील शिक्षण घेतले. बी.एससी ॲग्री झाल्यानंतर शेतीला पूरक असणारे कोर्स त्याने पूर्ण केले आहेत. यामध्ये ॲग्री क्लिनिक्स ॲन्ड ॲग्री बिझनेस सेंटर्स हा कृषी क्षेत्रातील युवा उद्योजकांसाठी असणारा कोर्स बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पूर्ण करुन सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतले आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र कालवडे (कराड) येथे गांडुळ खत निर्मिती प्रशिक्षण घेतले आहे. तसेच सुभाष पाळेकर यांचा नैसर्गिक शेतीचा एक महिन्याचा कोर्स केला आहे. घेतलेल्या ज्ञानाचा व्यावसायिक जीवनात उपयोग करण्यासाठी त्याने गांडुळ खत निर्मिती व विक्री सुरु केली आहे. या खताचा त्याने राॅयल गांडूळ हा ब्रॅंड तयार केला आहे. तसेच आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना मार्गदर्शन देखील करत आहे.

हरीत क्रांतीमुळे शेतीच्या उत्पादनात मोठया प्रमाणात वाढ झाली. पण हळूहळू जमिनीचा पोत बिघडत गेला. जमिनीची उत्पादन क्षमता कमी होवू लागली. रासायनिक खतांचे प्रमाण जास्त झाल्याने त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होवू लागला. त्यामुळे सर्वजण पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीकडे वळू लागलेत. लोकांच्या शेतीकडे कल वाढावा, रासायनिक खते न टाकता उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मी या क्षे़त्रात पडलो असल्याचे मत विजय काळे याने व्यक्त केले. सध्या माझ्या या गांडुुळ खत निर्मितीमधून वार्षिक 110 टनाच्या आसपास खतांची निर्मिती होत आहे. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. तसेच टाॅनिक म्हणून फवारणीसाठी साधारणपणे 7 ते 8 हजार लीटर व्हर्मी वाॅश तयार करतो. याशिवाय कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क सुमारे 1200 लीटर तयार करतो. सेंद्रीय मसाले गुळ वार्षिक 2200 किलो इतका तयार होत असतो.

कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्या मदतीने त्याने हा प्रोजेक्ट तयार केला असून साधारणपणे 18 लाख पर्यंत त्याची गुंतवणूक केली आहे. या प्रोजेक्टमधून त्याला सध्या गांडुळ खत निर्मिती, सेंद्रीय टाॅनिक, दशपर्णी अर्क, कीटकनाशक, सेंद्रीय मसाले गुळ, अॅग्रो कन्सल्टींग इ. मधून सर्व खर्च वजा जाता वार्षिक 4 ते 5 लाख रु. मिळत आहे.

रासायनिक खते, कीटकनाशके यामुळे मानव व जमिनीच्या आरोग्यास धोका आहे. विजय याने स्वतः प्रशिक्षण घेवून हे निर्मिती प्रकल्प उभे केले आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणींना यात सामोरे जावे लागले. परंतु येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून तो शिकत राहिला. त्याचा त्याला आता फायदा देखील होत आहे.

सुरुवातीला या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांकडून त्याला विरोध झाला. परंतू त्याची या क्षेत्रातील आवड, परिश्रम करण्याची तयारी पाहून घरच्यांनी त्याला यात खूप मदत केली आहे. आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही व्हावा यासाठी त्याच्या या प्रोजेक्टला गावकरी देखील मदत करत आहेत. गावांमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास या निमित्ताने लोकांची चांगली गर्दी होते.

सदर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारत असताना कृषी विज्ञान केंद्र कालवडे, कराड येथील तज्ञ शिक्षक, कृषी विज्ञान केंद्र बारामती, ॲग्री काॅलेज रेठरे येथे तसेच कृषी विभागातील अधिकारी यांनी देखील त्याला सहकार्य केले.

  माझ्या आवडीच्या कृषीच्या क्षेत्रातच मी करिअर करत असून याचा मला भविष्यात नक्कीच फायदा होईल. जमिनीचा पोत राखण्यासाठी प्रयत्न करणे, गांडुळ खत मोठया प्रमाणात निर्यात करणे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे हे माझे भविष्यातील नियोजन आहे. पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देत शेतीत यशस्वी होता येवू शकते. तसेच कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी असल्याने तरुणांची देखील एक करिअर म्हणून याकडे वळण्यास हरकत नाही. असे मत विजय काळे यांने यावेळी बोलताना व्यक्त केले.

  विभागातील शेतकरी वर्गाला कृषी क्षेत्रातील सर्व तंत्रज्ञान, माहिती, विविध नाविण्यपूर्वक योजना, उपक्रम, प्रशिक्षण, गटशेती, घरच्या घरी कमी खर्चात ओैषधे कशी करावित यासाठी विजय प्रयत्नशील आहे. शेतकऱ्याला शेतीच्या बाबतीत सुशिक्षित बनवणे हे त्याचे ध्येय आहे.

विजयच्या कार्याची दखल म्हणून कोल्हापूर आकाशवाणीवर हॅलो किसान कार्यक्रमात ‘उत्कृष्ट गांडूळखत निर्मिती आणि सेंद्रीय मसाले गुळ निर्मिती’ या दोन विषयांवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्याला बोलावण्यात आले होते. मालदन मधील विजय काळे या ध्येयवेडया युवा शेतकऱ्याचा आदर्श घेवून तरुणांनी यामध्ये उतरायला हरकत नाही.
____________________________________

सेंद्रीय शेतीमधील मसाले गुळ निर्मिती बाबत थोडंसं...

22 गुंठे उस लागण मसाले गुळ निर्मिती करताना 2 वर्षाची ऊसाची पाचट शेतात गाढली. हिरवळीचे स्वतःसाठी ताग विस्कटून 2 महिन्यात 7 फुट उंचीचा खतासाठी ताग जमिनीत गाढला. ताग काढताना नत्र, स्फुरद व कंपोस्ट कल्चर जीवाणूंचा वापर मोठया प्रमाणात केला.

व्हीएसआय मांजरी पुणे येथील टिश्यू कल्चरचे बीयाणे, घरी तयार केेलेले तेच बीयाणे लागणीसाठी वापरले आहे. 4 फुटी सरी पध्दत वापरली आहे.

लागण करताना जैविक बेणे प्रक्रिया पीएसबी व ट्रायकोडर्मा या जीवाणूंचा वापर ऊस लावताना 1 टन गांडूळखतांचा वापर केला आहे.

ऊसाला आळवणी व फवारणीसाठी गोमुत्र, व्हर्मी वाॅश, जीवामृत, ताक, दशपर्णी अर्क यांचा वापर तसेच सर्व प्रकारचे जीवाणू खते वापरली आहेत.

200 लीटर व्हर्मीवाॅश, 1200 लीटर जीवामृत, 20 लीटर दशपर्णी अर्क, 140 लीटर गोमुत्र यांचा वापर पाठपाण्याव्दारे आळवणीसाठी केला आहे.

ऊसाला भर घालताना 1200 किलो गांडूळखताचा वापर, 1 पोते निंबोळी पेंड, 20 किलो शेंगदाणा पंेड याचा त्यासोबत वापर केला आहे. किड नियत्रंणासाठी मोठया प्रमाणात मित्र कीटक उपलब्ध होते.या सर्व प्रकारच्या खतांमुळे जमीन भुसभुशीत होवून गांडूळांची संख्या मोठया प्रमाणात वाढली. यामुळे जमिनीचा सेंद्रीय कर्ब मोठया प्रमाणात वाढला. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता 22 गुठयांमध्ये 22 टन उसाचे उत्पन्न मिळाले. व त्यापासून उत्तम प्रतिचा मसाले गुळ तयार करण्यात आला. या गुळाला प्रति किलो रु.100 ते 150 किलो दर मिळाला असल्याचे युवा शेतकरी विजय काळे यांनी सांगितले आहे.

केमिकलमुक्त गुळाची वैशिष्टये :

क्षारमुक्त पाणी असल्याने अप्रतिम चव, रसायनमुक्त जमीन, त्यामुळे इतर गुळापेक्षा गुणकारी औषधी, रासायनिक भेंडी पावडर ऐवजी देशी भेंडी, बाजारातील तेलाऐवजी देशी गाईचे तूप, गुळ चवदार/सुगंधी होण्यासाठी वेलची व सुंठ पावडरचा वापर