गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातील ४४ कोरोनाग्रस्त रुग्णांचे स्थलांतर

मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूर परिसरातील गोवंडीत असलेल्या शताब्दी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ४४ कोरोनाग्रस्त रुग्णांचे नुकतेच पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

सध्या गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळेच अखेर या रुग्णालयातील ४४ रुग्णांना कोणताही धोका पत्करू न देता त्यांचे राजावाडी रुग्णालयात हलवले. ही माहिती कळताच शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी तत्काळ महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला आणि येथील परिस्थितीची सत्य माहिती सांगितली.त्यानुसार महापौर पेडणेकर यांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी चर्चा करून या रुग्णालयात आता ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पालिका अधिकारी हिर्लेकर यांची नियुक्ती केली आहे.तसेच रायगडच्या नवीन ऑक्सिजन पुरवठा ठेकेदाराला नेमण्यात आले आहे. तसेच यापुढे नियमित ऑक्सिजन पुरवठा करण्याची त्याच्याकडून हमी घेण्यात आली आहे.