श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनेही परिसरात कोरोना सेंटर उभारावे प्रवीण जुवाटकर यांची मागणी

 मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असताना अनेक रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या धर्तीवर दादरच्या श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनेही आपल्या मालकीच्या जागेत तात्पुरते कोरोना सेंटर उभारण्याची गरज असल्याचे मत गिरगाव परिसरातील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जुवाटकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.तसेच तशी मागणीही जुवाटकर यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे केली आहे.

प्रवीण जुवाटकर यांनी म्हटले आहे की ,

सिद्धिविनायक मंदिर परिसरात या ट्रस्टच्या दोन मजली इमारतीमधील हॉलमध्ये कोरोना सेंटर उभारणे सोपे जाऊ शकेल. त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. याठिकाणी कोरोना सेंटर उभारून त्याठिकाणी किमान ५०० बेडची सुविधा निर्माण करू शकता येईल.तसेच ट्रस्ट तर्फे घरीच क्वारंटाईन राहत असलेल्या रुग्णांना चांगल्या प्रतीचे बेड वजा पलंग बिछाने ,

ऑक्सिजन सिलिंडर , थर्मामिटर भाड्याने द्यावेत तसेच मास्क ,सॅनिटाझर आणि हँडवॉश तसेच सर्दी खोकला,तापावरील अँटिबायोटिक गोळ्या , विनामूल्य लसीकरण आणि किमान २ हजार लोकांना मोफत जेवणाची सोय केली जावी असेही प्रवीण जुवाटकर यांनी म्हटले आहे.