मुंबईतील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची शक्यता


मुंबई- मुंबईतील कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारू लागली असून काल सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी १५ मे पर्यंत निर्बंध कायम ठेवावेत, असे पत्र आपत्ती व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यभरात १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाबंदीही लागू करण्यात आली आहे. तरीही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, जळगाव, बीड, यवतमाळ सोलापूर यांसह अन्य शहरांत व ग्रामीण भागांत नियमांचे पालन तंतोतंत न करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. गेल्या तेरा दिवसांत सोलापूर शहरातील बेशिस्तांकडून पोलिसांनी २७ लाखाहून अधिक दंड वसुल केला असून महापालिकेनेही दंडात्मक कारवाई केली आहे. बेशिस्तांवर लक्ष ठेवून पोलिसांमार्फत कारवाया वाढवाव्यात अशी सूचनाही आपत्ती व्यवस्थापनाने पत्रातून केली आहे. तसेच कडक संचारबंदी आणखी १५ दिवसांनी वाढवल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, आरोग्य यंत्रनेवरील ताण कमी होईल आणि तोपर्यंत लसीकरणाचा वेगही वाढेल, ही बाबही आपत्ती व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केली आहे.