मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यातील कोरोनाची लाट अजूनही उसळी मारताना दिसत आहे. रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.ही चिंताजनक परिस्थिती लक्षात एसटी महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील मोकळ्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक १५२ च्या भाजप नगरसेविका आशा मराठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
नगरसेविका आशा मराठे यांनी आपल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, प्रत्येक जिल्ह्यात एसटी महामंडळाची एक विभागीय कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत सक्षम मनुष्यबळ आहे. तसेच बेड बनविण्यासाठी आवश्यक ते साहित्य म्हणजे फोम, रेक्झिन,कापड ,शिवणयंत्र आदींचा साठा उपलब्ध असतो.तसेच रुग्णवाहिकेची सुविधाही आहे.आणखी काही साहित्य लागल्यास फंड उपलब्ध करून दिल्यास ते सुद्धा मिळेल.त्यामुळे एसटी महामंडळाकडील सुविधांचा योग्य वापर करून अगदी कमी कालावधीत शीघ्रगतीने कोविड सेंटर उभारणे शक्य होणार आहे. तसेच खासगी किंवा सरकारी डॉक्टरांना विशेष मानधन देऊन वैद्यकीय उपचार करता येऊ शकतील.जेणेकरून कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचेल. तरी या सर्व बाबी लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेत कोविड सेंटर उभारावे असेही आशा मराठे यांनी म्हटले आहे.