मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : केंद्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा लसीकरणासाठी देशातील सर्व राज्यांना सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने लसी खरेदी करण्यासाठी या कंपन्यांशी बोलणी केली असता केंद्र सरकारने स्वतःच महिनाभराचा साठा आधीच बुक केल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांची अडवणूक करत आहे हे स्पष्ट होते, असा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की राज्यसरकारने सीरम इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला तेव्हा अदर पूनावाला यांनी महाराष्ट्र सरकारला सांगितले की, केंद्र सरकारने २४ मे पर्यंतच्या लसींचा साठा आधीच आरक्षित केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला किमान महिनाभर तरी सीरम इन्स्टिट्यूटकडून लसी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीकडून कोव्हॅक्सिन मिळविण्यासाठी चर्चा करीत आहेत.
मात्र भारत बायोटेक कंपनीने आपल्या लसीचे दर अद्याप निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे भारत बायोटेक कंपनीकडून कधी लस मिळतील हे सांगता येत नाही.याशिवाय अमेरिका, ब्रिटन, जपान आणि रशिया यांच्या लसी महागड्या असल्याने त्या फक्त श्रीमंत नागरिकांनाच परवडू शकतात.
राजेश टोपे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करावा यासाठी मी राज्याचा आरोग्यमंत्री या नात्याने केंद्र सरकारच्या पायात पडायला तयार आहे. मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता आणि वाटप हे केंद्र सरकार करते. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला मेडिकल ऑक्सिजनचा जास्त कोटा द्यावा, तसेच ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सुरक्षित ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर तयार करून द्यावा अशी मागणीही राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.