अंबानीनंतर उद्योगपती टाटा यांची कंपनी देणार दररोज ३०० टन मेडिकल ऑक्सिजन !

 मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नंतर आता उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा स्टील कंपनीने महाराष्ट्राला दररोज ३०० लिक्विड मेडिकल ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा यांच्याप्रमाणेच जिंदाल स्टील, आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील व भारत सरकारच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्राला वैद्यकीय ऑक्सिजन देण्याची तयारी दाखविली आहे.

टाटा स्टील कंपनीच्या प्रवक्त्याने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

कोरोनाची राष्ट्रीय आपत्ती समजून टाटा स्टील कंपनी महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या आणि विविध रुग्णालयांना दरदिवशी २०० ते ३०० लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करणार असल्याचे या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे जिंदाल स्टील त्यांच्या महाराष्ट्रातील डोलवी येथील प्लांटमधून महाराष्ट्राला दरदिवशी १८५ टन मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करीत आहे. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी त्यांच्या गुजरातमधील हाजरा येथील प्लांटमधून वाढदिवशी २०० मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्राला देत आहे. भारत सरकारच्या मालकीच्या स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने आतापर्यंत महाराष्ट्राला ३३,००० मेट्रिक टन मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा केला आहे.