वाहनांवर विशिष्ट स्टिकर लावण्याची मुंबई पोलिसांची योजना अखेर रद्द

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : लॉक डाउन काळात मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना वाहनाला एक खास स्टिकर लावण्याचे

आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले होते. यासाठी मुंबई पोलिसांनी खास ३ रंगाची स्टिकर योजना सुरु केली होती.मात्र मुंबई पोलिसांच्या या योजनेबाबत गोंधळात गोंधळ दिसून येऊ लागल्याने अवघ्या सात दिवसात मुंबईतील ही कलरकोड स्टिकर योजना बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. 

आता मुंबईत कलरकोड स्टिकर लावणे बंधनकारक नाही, असे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदी आणि कडक निर्बंध लावूनही मुंबईतील वाहनांची वर्दळ सुरूच राहिल्याने अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम पाहायला मिळत होता.कोणत्या रंगाचा स्टिकर  वाहनाला लावायचा याबाबत अनेकजण गोंधळले होते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना याबाबत अनेक सवालही विचारण्यात आले होते.त्यामुळे मुंबई पोलिसांनी तयार केलेली ही पद्धत अवघ्या सात दिवसात त्यांच्यासाठी तापदायक बनली होती.त्यामुळे पोलिसांनी हा कलर कोडचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील वाहनांना लाल, पिवळा, हिरव्या रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.