वांग खोऱ्यातील व्यापारी केंद्र असणाऱ्या ढेबेवाडी व तळमावले बाजारपेठेत जनता कर्फ्यु


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

बाजारपेठेतील लोकांची वाढती गर्दी व विभागातील कोरोना बाधिताची वाढती संख्या पाहता ढेबेवाडी विभागातील  व्यापारी केंद्र असणाऱ्या तळमावले व ढेबेवाडी ग्रामपंचायतीने उद्या बुधवारपासून  कोरोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पुकारण्यात  आला आहे.  ग्रामपंचायतीने हा मोठा निर्णय घेतला असून भागातील जनतेने व व्यापारी वर्गाने याकरिता सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.

ढेबेवाडी व तळमावले बाजारपेठेत संचारबंदी असताना देखील लोकांची मोठी गर्दी होत आहे. विभागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बुधवार दि. २१ पासून जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. याबाबत ढेबेवाडी, मंद्रुळकोळे व तळमावले ग्रामपंचायतीने कडक अंमलबजावणीच्या सुचना दिल्या आहेत. 

       ढेबेवाडी, तळमावले व सणबूर या बाजारपेठेत विविध खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे विभागात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मल्हारपेठ , नवारस्ता जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी ढेबेवाडी येथे भेट देऊन यासंदर्भात ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, ढेबेवाडीचे सरपंच विजय विगावे, मंद्रुळकोळे सरपंच अमोल पाटील यांच्याशी चर्चा करून लोकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली. ढेबेवाडी व तळमावले बाजारपेठेत दवाखाने व मेडीकल, बँका, पतसंस्था वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सुचना ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी विभागातील मोठी व गर्दीची असणारी सणबूर, काळगाव, धामणी, कुंभारगाव येथील ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यु लावून कोरोना रोखण्यास मदत केली पाहिजे. तरच विनाकारण व जुजबी कारणे देऊन उगीचच फेरफटका मानणार्‍यांना चाप बसेल व कोरोना वाढीस ब्रेक लागेल. 

_____________________________________

  विनाकारण फिरणाऱ्यानो सावधान पोलिसांच्या मदतीने आपली होणार कोरोना चाचणी.

प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी ढेबेवाडी बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी विनाकारण फिरणार्‍या लोकांची कोरोना चाचणी  करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु आरोग्य विभागातील अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे कोरोना चाचण्या करण्यात आल्या नाहीत.  परंतु गुरूवार पासून पोलीसांच्या साहाय्याने विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. याचे भान विनाकारण फिरणार्‍यां जनतेने ठेेेेेवावे.

 यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटरची पाहणी केली.

_____________________________________