मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : विविध बाजार समित्या, वाहतूक कंपन्या, रेल्वे माल धक्के, खत कारखाने, औषध कंपन्या, बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर व अन्य जिल्ह्यातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी बोर्डातील नोंदीत माथाडी, वारणार, मापाडी, महिला कामगार व त्यासंबधित घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, त्यांना शासनाचे विमा संरक्षण कवच द्यावे, या घटकाला कामाच्या ठिकाणी रेल्वे, बस व इतर व्यवस्थेने प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या संबंधितांना सूचना द्याव्यात तसेच कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या माथाडी कामगारांचे हातावर पोट असल्याने या घटकाला शासनाने आर्थिक सहाय्याचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस मा.आमदार नरेंद्र पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे शासनाकडे केली आहे.
केंद्र व राज्य शासनाने कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी माहे मार्च,२०२० पासून सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला होता, त्यावेळी जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी जीव मुठीत घेऊन मालाची चढ-उताराची कामे माथाडी, वारणार, मापाडी, पालावाला महिला कामगारांनी केली आहेत, अशी कामे करताना अनेक माथाडी कामगारांना कोरोनाच्या विषाणूची बाधा झाली, काहींचा मृत्यू झाला, या घटकाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी शासनाकडे सतत मागणी करूनही शासनाने या मागणीची दखल घेतली नाही, रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली नाही, शासनाच्या माथाडी बोर्डाने दिलेल्या ओळखपत्रावर रेल्वे, बस सेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास माथाडी कामगारांना परवानगी मिळणे आवश्यक आहे. शासनाने घरेलू कामगार व इतर घटकाला आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे माथाडी कामगारांना कष्टाची कामे केल्याशिवाय मजुरी मिळणार नाही, त्यांची उपासमार होणार आहे. कष्टाची कामे करून देशाच्या अर्थकारणाला मदत करणाऱ्या माथाडी, वारणार, मापाडी, पालावाला महिला कामगारांना हक्काची कामे करण्यास त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यास प्रवासाची परवानगी व सहकार्य करण्याच्या सूचना राज्य शासनाने संबंधितांना द्याव्यात तसेच डॉक्टर्स, पोलीस व इतरांचा अत्यावश्यक सेवेत समावेश् करून त्यांना विमा कवच संरक्षण दिल आहे त्याप्रमाणे माथाडी कामगार व त्यासंबधीत घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा व त्यांना विमा कवच संरक्षण दयावे, अतांपर्यंत कामावर असताना कोरोना बाधा होवून मृत्यू झालेल्या माथाडी कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी व विनंती शेवटी पत्रकातून माथाडी कामगार नेत्यांनी केली आहे.