कोरोना काळातील सुविधा मागण्यांसाठी माथाडी कामगारांचे उस्फुर्त संप आंदोलन


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटात राज्य सरकारला सहकार्य करुन नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी जीव मुठीत घेऊन काम करीत असलेल्या माथाडी कामगार आणि अन्य घटकांच्या मागण्याची शासनाकडून दखल घेतली जात नाही म्हणून आज शनिवारी नवी मुंबई बाजार समिती आवार व जीवनावश्यक मालाच्या व्यवसायातील तमाम माथाडी कामगारांनी संप पुकारला होता व या संपात कामगारांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. 

यावेळी माथाडी व त्यासंबंधीत घटकाच्या न्याय मागणीची महाराष्ट्र शासनाने तातडीने सोडवणुक करावी, अशी मागणी करीत माथाडी कामगार देखिल माणूसच आहे, त्याचाही जीव आहे, त्याला न्याय द्या, अन्यथा पुढील होणा-या परिणामास संबंधितच जबाबदार रहातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाऊन जाहिर केला असून माथाडीसह अन्य घटकाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, रेल्वे, बससेवा व अन्य व्यवस्थेने प्रवास करण्यास परवानगी द्यावी, त्यांना विशेष विमा संरक्षण कवच लागू करावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या माथाडी कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी या मागण्या शासनाकडे संघटनेने केल्या आहेत.