कुंभारगाव,मानेगाव विभागात विजेचा लपंडाव.

विज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण विरोधात नागरिकांतून आंदोलन छेडण्याचा इशारा.तळमावले | राजेंद्र पुजारी :         
कष्टकरी, शेतकरी, सामान्य जनता कोरोना संसर्गाच्या या महामारी मुळे मागील एक वर्षापासून भीतीच्या छायेखाली वावरत आहे. पुन्हा कोरोनाची दुसरी लाट राज्यावर येऊन थडकलेली आहे. कोरोना बाधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. ऑक्सीजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करावी लागत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. कोरोनाची या दुसऱ्या लाटेची भीती आज सर्वत्र दिसत आहे. यामध्येच लॉकडाऊन झाले आहे. अनेक कामे ठप्प आहेत. त्यात एप्रिल महिना चालू आहे त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला आहे. शासन लोकांना घरीच बसण्याच्या सूचना करत आहेत. मात्र आधीच विविध संकटाने त्रस्त असलेल्या या सामान्य नागरिकांचे घरी बसून ही खूप हाल होत आहेत. याचे कारण म्हणजे विजेचा खंडित पुरवठा कुंभारगाव व मानेगाव या विभागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
कुंभारगाव, मानेगाव विभागात घरगुती, शेती पंप,यांना कोळेवाडी सबस्टेशन मधून वीज पुरवठा केला जातो, परंतू सातत्याने वीज प्रवाह खंडित होत असल्याने सामान्य नागरिक संतप्त झाले आहेत. कोरोनाच्या पार्शवभूमीवर ढेबेवाडी, तळमावले विभागात कोरोना पेशंट वाढत असल्याने मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायत व प्रशासन याचे वतीने जनता कर्पू लावला असून सर्व नागरिक घरी बसून आहेत. ऐन उन्हाळ्यात उन्हाची त्रीवता वाढल्याने, घरी उष्णतेचे चटके, बाहेर कडक निर्बंध,या दोन्ही बाजूने नागरिक हैराण झालेचे चित्र दिसत असून, महावितरणने मागील वर्षाच्या लॉकडाउन मधील वीज वापरातील बिल ग्राहकाकडून पूर्ण वीज बिल वसूल केली आहेत. परंतु सेवा देण्यात हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र या विभागात दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवेतील, पिठाच्या गिरण्या, मिरची कांडप यंत्र, पोल्ट्री, शेती पंप, अन्य विजेवर चालणारे जोड धंदे, विजेच्या लपंडावामुळे बंद पडून, त्याचा नाहक त्रास येथील जनतेला सहन करावा लागत आहे.
कोळेवाडी वीज वितरण सबस्टेशने जनतेच्या या तक्रारीची दखल घेऊन तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा. जनतेचा विचार करून वीज पुरवठा खंडित होऊ नये याकडे लक्ष द्यावे, अन्यथा महावितरण विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.