तळमावले, ढेबेवाडी विभागातील लसीकरण केंद्र ठप्प.

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा 

तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या कर्पेवाडी, काढणे, गलमेवाडी, शेंडेवाडी, गुढे, शिद्रुकवाडी, या गावात लसीकरनाचे कॅम्प घेण्यात आले होते नागरिकांनी लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद दिला होता. साधारणपणे 1500 लोकांना या केंद्रामार्फत लस देण्यात आली.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची अत्यंत बिकट अवस्था आहे. जिल्ह्यातील कोऱोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातील या विभागातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय या पार्श्वभूमीवर अनेक लोक लस घेण्याला प्राधान्य देत आहेत. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भेटत आहेत मात्र कालपासून ही सर्व लसीकरण केंद्रे लस शिल्लक नसल्याने बंद आहेत.

याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर दैनिक कृष्णाकाठ च्या प्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्या लस नसल्याने लसीकरण मोहीम तात्पुरती थांबली आहे. मात्र आमचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालू आहे उद्या रात्रीपर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच पुन्हा या मोहिमेस सुरुवात होईल लोकांनी थोडासा संयम ठेवावा पात्र असलेल्या सर्व व्यक्तींना लस देण्यात येईल. कोणतीही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची आरोग्य कर्मचारी निश्चितपणे काळजी घेतील.

कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे विभागातील नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे की कोरोना संदर्भात शासनाने दिलेले नियम पाळून आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण कोरोनाला रोखू शकतो. सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. उमेश गोंजारी यांनी केले आहे.

शासनाने ग्रामीण भागातील या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तातडीने लसीचा पुरवठा करून विभागातील जनतेची समस्या दूर करावी अशी आग्रही मागणी विभागातील जनतेने शासनाकडे केली आहे.