केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत : पृथ्वीराज चव्हाण

 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या 20 ऑक्टोबर 2020 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, 

          “... वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे..... मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सीजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही."   

देशभरात वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सांगताना ते म्हणाले,

     1) केंद्र शासनाने देशभरातील 390 दवाखान्यात PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन केले आहे. 

      2) कोरोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने 1 लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  

सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की सरकारने अतिरिक्त 1 लाख MT ऑक्सिजन आयात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली. परंतु मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला हताश फोन येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खालील प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत.  

1) ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत “आपण अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) आहोत " हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता? 

2) 1 लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयातीचे काय झाले ? 5 महिन्यात ते का आयात केले नाही ? हि प्रक्रिया कोणी थांबवली? 

3) आतापर्यत देशभरात मंजूर केलेल्या 162 PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त 33 दवाखान्यातच उभा केले आहेत, व त्यापैकी महाराष्ट्रात फक्त एक प्लॅन्ट उभारला आहे. हे खरे आहे का? 

          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना "भारताने कोरोनाला कसे हरवले" अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत.  

आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सीजनअभावी मृत्युमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे अशी मागणी मी करतो.