6 एप्रिल हा अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांचा जन्मदिवस.... त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...


सन 2010 ला मी शिवसमर्थ चा पहिला दिवाळी अंक डिझाईन केला. 20 आॅगस्ट, 2020 रोजी भाऊंची आणि माझी ओळख झाली. ही भेट दै.नवाकाळ चे उपसंपादक शंकर कडवसाहेब यांच्यामुळे झाली. पत्रकार, साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्ती म्हणून भाऊंना मी तो दिवाळी अंक भेट दिला. आणि आश्चर्य म्हणजे गुरुवार दि.16 डिसेंबर, 2010 रोजी त्यांनी दै.नवाकाळ च्या प्रथम अध्र्या पानावर या दिवाळी अंकाविषयी अग्रलेख लिहला.

त्यांनी लिहलेला अग्रलेख म्हणजे या दिवाळी अंकातील साहित्यिकांचा गौरव होता. संपूर्ण महाराष्ट्रभर या लेखाने शिवसमर्थची प्रसिध्दी झाली. अनेकांचे पत्रे, फोन आले. अनेकजण प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देवून गेले. यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर प्रत्येक दिवाळी अंकावेळी मी त्यांना न चुकता प्रत्यक्ष भेटून किंवा फेान वरुन दिवाळी अंकासाठी साहित्य मागवायचो. आणि विशेष म्हणजे अगदी हक्काने मला भाऊं वेळेत साहीत्य पाठवायचे. त्यामुळे शिवसमर्थ दिवाळी अंक आणि त्यातील पहिला लेख आदरणीय खाडीलकर भाऊं यांचा ही परंपराच झाली होती. ही परंपरा सलग 9 वर्षे चालू होती. दोन वर्षापूर्वी त्यांचे अकाली निधन झाले. याचे मनाला खूप दुःख होत आहे.

दिवाळी अंक किंवा इतर कोणताही अंकाचे प्रकाशन असले तरी ते मी भा भाऊंच्याकडून हक्काने करुन घ्यायचो. भाऊं कितीही गडबडीत असले तरी त्या अंकाचे वाचन, अवलोकन करायचे, चुका असल्या तर ते दाखवून द्यायचे, चांगल्या गोष्टीचे पाठीवर थाप मारुन कौतुक करायचे. तासन्तास या गोष्टी घडायच्या. भाऊंची काळजी घेणारा संतोष गायकवाड त्यावेळी सांगायचा, भाऊ औषध घ्या, ज्युस घ्या. किती आपलेपणा या प्रसंगात असायचा.

भाऊंचे आणि माझे, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांचे जिव्हाळयाचे संबंध निर्माण झाले होते. या मुळेच डोकं चालतंच राहत भाग 1 व 2, काल आणि आज, संस्कृती, शिवाजी महाराज आणि त्यांच शिलेदार, मोग्ऱ्यांचा गजरा या 6 पुस्तकांची मुखपृष्ठे बनवण्याचे खूप मोठे भाग्य मला लाभले. कितीतरी आठवणी मी सांगू शकतो.

त्यांच्या मोग्ऱ्यांचा गजरा या पुस्तकाचे प्रकाशन होण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. हा प्रसंग खूप दुःखद असाच होता. त्यांची उणीव मला नेहमीच जाणवते. 6 एप्रिल या त्यांच्या वाढदिनी पुन्हा त्यांची प्रकर्शाने आठवण झाली. एक मार्गदर्शन करणारी व्यक्ती, प्रेमाने पाठीवर कौतुकाची थाप पाठीवर टाकणारी, हक्काने रागवणारी ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व असणारी व्यक्ती आपल्यात नाही याची पदोपदी आठवण येतेय. त्यांची आठवण आली तरी डोळयाच्या पापण्या आपसूकच ओलावतात. आदरणीय भाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!

- शब्दांकन: डाॅ.संदीप डाकवे