सातारा ते कागल महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसाठी 558 कोटी 24 लाख निधी मंजूर.

खा.श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

खा.श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीसह महामार्ग दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे.

     कागल ते शेंद्रे महामार्गाच्‍या पटृयातील पाच धोकादायक ठिकाणांच्‍या (ब्‍लॅक स्‍पॉट) दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामधील पाच पैकी चार ठिकाणे ही सातारा जिल्‍हयातील असून त्‍यामध्‍ये मलकापूर (ता. कराड) येथील नव्‍या उड्डाणपूलासाठी 459  कोटी 52 लाख रुपये, मसूर फाटा येथील अंडर पास पूलासाठी 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा अंडर पास पूलासाठी 45 कोटी 35 लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड कि.मी. अंतराच्या सर्व्‍हीस रस्त्यासाठी 6 कोटी 19 लाख  निधीची तरतूद करण्‍यात आलेली आहे. सदर कामांची अंमलबजावणी सातारा-कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरण कामाबरोबरच करण्‍यात येणार आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांनी मागणी केलेल्या सदर कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. 

    सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत निवडून आल्यानंतर खा.श्रीनिवास पाटील यांनी कामाचा धडाका लावला आहे. निवडणूक निकालानंतर त्यांनी लगेचच नोव्‍हेंबर 2019 मध्ये केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी  पत्रव्‍यवहार करुन तर अनेकदा त्यांना प्रत्‍यक्ष भेटून सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. सातारा ते कागल अशा 132 कि.मी. अंतरामध्‍ये मार्गाची झालेली दुर्दशा, त्यामुळे वहातूकीसाठी निर्माण होत असलेली  धोकादायक परिस्थिती तसेच  या पटृयात होणारे अपघातांचे प्रमाण आणि त्यामध्ये नागरिकांचे जाणारे नाहक बळी याबाबत त्यांनी ना.गडकरी यांचे लक्ष वेधले होते.  खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन ना.गडकरी यांनी दि. 22  सप्‍टेंबर 2020 रोजी पत्र लिहून त्यांना आपल्‍या मागणीप्रमाणे सातारा-कागल महामार्गावरील प्रमुख पाच धोकादायक व अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करुन त्‍याची दुरुस्‍ती व सुधारणा करण्‍याचे काम हाती घेतले असल्याचे कळविले होते. त्यानंतरही  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या  बजेट अधिवेशनातील  प्रश्‍नोत्‍तराच्‍या काळात  खा.श्रीनिवास पाटील यांनी हे मुद्दे लावून धरत महामार्ग संदर्भातील आपल्या मागण्या केल्या होत्या. खा.पाटील यांनी केलेल्या मागण्या व सूचनांना ना.नितीन गडकरी यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दर्शवून या मागण्यांची सोडवणूक त्वरित केली जाईल असे त्यावेळी आश्वासित केले होते.


     सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गा संदर्भात केलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष्य देवून मोठा निधी उपल्ब्ध करून दिल्याबद्दल ना. गडकरी यांचे खा.पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान जिल्‍हयातील राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील इतर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करुन त्‍याबाबत केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्रालयाला कळवण्यात यावेत. त्‍याबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येथील असे ठोस आश्‍वासन ना.गडकरी यांनी खा.श्रीनिवास पाटील यांना लोकसभेत केलेल्या प्रश्‍नांना उत्‍तर देताना दिले होते. त्यासाठी लवकरच ‍जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व आर.टी.ओ. अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्‍हयातील सर्व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्‍याचे काम हाती घेणार असल्‍याचे खा.श्रीनिवास पाटील यांनी सांगितले आहे.