माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून साकारला जाणार रेठरे बु. येथील नवीन पूल

 कृष्णा नदीवरील नवीन रेठरे पुलाच्या रु. ४५ कोटींच्या कामाला राज्यअर्थसंकल्पात मंजूरी.  

कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा : कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बु. येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला काल झालेल्या राज्य अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.   

रेठरे येथील कृष्णा नदीवरील पूल दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गाला व रेठरे बुद्रुक मार्गे सांगली जिल्ह्याला जोडणारा दुवा आहे. सध्या अस्तित्वात असणारा पुल कमी उंचीचा आहे त्यामुळे तो पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच अवजड वाहनांच्या दळणवळणाने सध्याचा पूल खचला असल्याने बांधकाम विभागाने काही महिन्यापूर्वी पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद केली होती. परंतु काही दिवसांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम विभागाची तातडीने बैठक घेऊन पुलाच्या मजबुतीचा अहवाल मागविला होता व त्यानंतर फक्त हलक्या वाहनांसाठी हा पूल सुरु करण्यात आला होता. 

यामुळे अवजड वाहतूक तसेच उसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक हि कराड शहरातून होत होती. ट्राफिक वर याचा परिणाम होत होता तसेच थोड्या अंतरासाठी मोठा वळसा घालून यावे लागत होते यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून व रेठरे बु. येथील कृष्णेच्या पुलाचे महत्व लक्षात घेता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवीन पुलाच्या उभारणीसाठी निधी मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न केले होते व त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या पुलाकरिता रु. ४५ कोटींची मान्यता मिळाली असून यावर्षी सुरुवातीस सुमारे ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाच्या उभारणीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेठरे बुद्रुक, खुबी, गोंदी या गावांसह सांगली जिल्ह्याला जाण्यासाठी दळणवळण सुकर होणार आहे. तसेच हा पूल कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीस वरदान ठरणार आहे.   



यापूर्वीच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाचवड-कोडोली नवीन पूल उभारणीला ४५ कोटीं रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून आणला होता, आता त्या पुलाचे कामही सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पृथ्वीराज बाबांनी कोडोली-पाचवड पुलाच्या जागेला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता. आता आणखी एक महत्वपूर्ण असा रेठरे बुद्रुकचा पुल मंजूर झाल्याबद्दल या भागातील जनतेने पृथ्वीराज बाबांचे अभिनंदन करीत समाधान व्यक्त केले आहे.