दुकानदार व भाजी विक्रेत्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारीत आदेश जारी


 सातारा दि.10 (जिमाका): सातारा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविड संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असून या वाढत्या रुग्णसंख्येला वेळीच नियंत्रण आणण्यासाठी अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे व्यापारी, रास्तभाव, किरकोळ दुकानदार व भाजीपाला दुकानदार इत्यादींना पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. 

 दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी दुकानदारांनी पांढऱ्या रंगात चौकोनी, गोल मार्किंग निश्चित करावे. एकाचवेळेस दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहक घेऊ नये. दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकामधील अंतर किमान एक मीटर असणे आवयक आहे. दुकान परिसरामध्ये स्वच्छता राखणे आणि वेळोवेळी सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. दुकानामध्ये दुकानदारासह ग्राहकांनी कायमस्वरुपली मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. भाजी विक्रेत्यांनी एकाच वेळी जासत ग्राहक जमणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

 वरील प्रमाणे कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमिक करण्यात आलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आणि संबंधितांकडुन या आदेशाचा भंग झाल्यास रु. 1000/- दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच दुकान पुढील 7 दिवसांसाठी सक्तीने बंद करण्यात येईल. त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येवून नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्यास येईल.