ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आजारी आईवर उपचार करण्यासाठी तिची मुलगी तिला फलटण तालुक्यात घेऊन गेली मात्र तिथे वृद्धेचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला.तिला उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यापुर्वीच त्या वृद्धेचा मृत्यू झाला. मात्र ते गुप्त ठेवत मृतदेह मुळगांवी आणून त्यावर विधिवत अंत्यसंस्कार केल्याची घटना विंग ता.कराड येथे उघडकीसआली आहे.अंत्य विधीसाठी उपस्थित 40 जणांच्या तपासणीत एका लहान मुलीसह 4 जण पाँझिटीव्ह सापडल्याने एकच खळबळ उडून विंगकरांची मात्र धाकधुक वाढली आहे.
याबाबतची माहिती अशी की विंग ता.कराड
येथील एक वयोवृद्ध महिला वय 78 वर्षे ही आजारी आहे तिची सेवा करण्यासाठी म्हणून तिच्या मुलीने तिला हिंगणगांव ता.फलटण येथे नेले होते,तिला उपचारासाठी लोणंद येथे एका खासगी रूग्णालयात दाखल केले.तिथे संशयित म्हणून कोरोना तपासणी केली असता अहवाल बाधित आला.
तेंव्हा तेथील डॉक्टरनी तिला उपचारार्थ कोविड सेंटरमध्ये दाखल करा असे सांगितले. मात्र तिथे नेण्यापुर्वी वाटेतच त्या वृद्धेचा मृत्यू झाला.कोरोनामुळे मृत्युझाला हे लपवून तिच्या मुलीसह नातेवाईकांनी एका खासगी रूग्ण वाहिकेतून तो मृतदेह विंग ता.कराड येथे परत आणला,व भावकी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले.
दरम्यान कराड तालुका आरोग्य विभागाला याची माहिती मिळाली तेंव्हा विभागाचे अधिकारी व कर्मचारी तिथे पोहोचण्या पुर्वीच सर्व उरकले होते.अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची माहिती घेऊन चाचणी घेण्यासाठी आरोग्य विभागाला अनेक जणांनी विरोध केला तरीही 40 लोकांची तपासणी केली असता एका लहानमुलीसह 4 जण कोरोना पाँझिटीव्ह सापडल्यमुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्या वृद्धेच्या नातेवाईकांनी ही बाब लपवून आरोग्य विभाग व प्रशासनाला गाफील का ठेवले? असा सवाल आरोग्य विभागासह ग्रामस्थानीही उपस्थित केला आहे.गेल्या वर्षी ग्रामस्थांनी कोरोना व लाँकडाऊनचे मोठे चटके सोसलेले आहेत.आता चार/पाच महिन्यानंतर गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावाची धास्ती मात्र वाढली आहे.