अडचणीतल्या साखर उद्योगाला केंद्र सरकारचे धोरणच जबाबदार...! मंत्री शंभूराज देसाईंचा केंद्र सरकारवर घणाघात.

देसाई कारखान्याची ५० वी वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभा खेळीमेळीत संपन्न.

पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी प्रमाणे योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे याबाबत केंद्रसरकार का निर्णय घेत नाही. त्यामुळे केंद्रसरकारचे धोरण देशातील सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायचे धोरण आहे का ? असा सवाल राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी केला.

                  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दूरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, जयराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

                    यावेळी बोलताना मंत्री देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफआरपी प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसदर दिला आहे याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफआरपी चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणच राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी जबाबदार आहे.परिणामी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.इथेनॉलच्या बाबतीत ही केंद्र सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने याचा गंभीर परिणाम सहकारी साखर कारखानदारी वर झाला असून कारखान्याने उत्पादित केलेल्या एकूण इथेनॉल पैकी केवळ २५ टक्के एवढेच इथेनॉल केंद्र सरकार विकत घेत आहे उरलेले ७५ टक्के इथेनॉल कारखान्यात पडून असल्याचे विदारक चित्र ही सध्या कारखान्याच्या पुढे आहे.परिणामी कारखानदारी अधिकच आर्थिक अडचणीत येताना दिसत आहे.

             राज्यातील आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून या उद्योगाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टी तुन निर्माण झालेल्या आणि स्व.शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही देवुन मंत्री देसाई म्हणाले, देशात आणि राज्यात सध्या कोविडजन्य परिस्थिती येऊन कोरोनाची दुसऱ्यां लाटेचा राज्यात प्रवेश झाला आहे देशातील एकूण १० हॉट स्पॉट जिल्ह्यापैकी तब्बल ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील असल्याने राज्यातील नागरिकांनी कोरोनाचा नियमांचे पालन काटेकोरपणे गरजेचे आहे.मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफआरपी.देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे.असेही यावेळी बोलताना म्हणाले.

             यावेळी युवानेते यशराज देसाई यांनी आपल्या सुमारे दोन वर्षांच्या कार्यकाळात देसाई कारखान्यात अनेक अत्यावश्यक असे तांत्रिक बदल केले असून त्यामुळे संस्थेसहित सभासद शेतकऱ्यांचा वेळ व मेहनत वाचून मोठा फायदा झाला आहे यापुढील काळात ही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून देसाई कारखाना राज्यातील एक आदर्श कारखाना करणार असल्याचे सांगितले.कारखान्याची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणांत पार पडली.

____________________________________

मंत्री शंभूराज देसाई व यशराज देसाई यांच्या अभिनंदनाचा ठराव 

               पाटणचे आमदार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृह,अर्थ,उत्पादन शुल्क,पणन,आणि कौशल्य विकास या महत्वपूर्ण खात्याचे राज्यमंत्री व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झालेबद्दल तसेच गेल्या दीड वर्षापासून देसाई कारखान्याची यशस्वीपणे धुरा सांभाळत असलेले युवा नेते यशराज देसाई यांचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याच्या सभासंदानी-शेतकऱ्यांनी मंत्री देसाईंच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने मंजुर केला.

या सभेत तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी सभासद ऑनलाईन उपस्थित होते.

____________________________________

 शरद पवारांकडून ही चिंता व्यक्त.

             साखर उद्योग अडचणीमधून काढण्यासाठी साखर उद्योगाशी निगडीत असणारे देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यापुढे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि मी स्वतः साखर उद्योगाच्या व्यथा मांडल्या त्यावेळी सध्या केंद्र सरकारचा साखर उद्योगाबाबतचा दृष्टिकोन पोषक दिसत नाही या पुढे काळजीपूर्वक पाऊले टाकावी लागणार अशी चिंता व्यक्त करून आम्ही देशाचे कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला भरभरून दिले अशी माहिती खा पवार यांनी आम्हा शिष्ट मंडळा पुढे व्यक्त केल्याची माहिती मंत्री देसाई यांनी सांगितली. 

____________________________________