गजा मारणे याला धाडस दाखवून अटक करणाऱ्या पोलीस निरीक्षक अमोल माने आणि सहकारी यांचा गृहराज्य मंत्र्यांनी केला गौरव


सातारा दि.15 (जिमाका): कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला अटक केली याबद्दल शासनाकडून योग्य सन्मान व्हावा यासाठी पाठ पुरावा करणार असल्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सांगितले.

गजा मारणे प्रकरणी कारवाईत समावेश असलेल्या मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे, इम्राण मेटकरी व अमोल पवार यांचा सत्कार गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सत्कारा प्रसंगी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

गजा मारणे याच्या शोधात पोलीस होते. कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली. त्यांचे कौतुक करुन शासनाकडून योग्य तो सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सत्काराप्रसंगी सांगितले.

यावेळी पोलीस हवालदार मोना निकम यांनी नऊवारी साडी घालून हिरकणी कडा सर केल्याबद्दल गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.