पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिल्लीतून दिली मोठी जबाबदारी.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची आसामच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड.

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आसाम राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाने छाननी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत कमलेश्वर पटेल, श्रीमती दीपिका पांडे सिंग, जितेंद्र सिंग, रिपून बोरा, देबब्रता साइकिया, अनिरुद्ध सिंग, पृथ्वीराज साठे, विकास उपाध्याय आदींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

येत्या दोन दिवसात या समितीची पहिली बैठक माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आसाम येथे आयोजित करण्यात आली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी गुजरात, कर्नाटक, जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, हरयाणा आदी राज्यांची प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली आहे. या सर्व पक्ष संघटनेबाबत जबाबदाऱ्यांचा अनुभव पाहता काँग्रेस पक्षाकडून आगामी आसाम निवडणुकीसाठी महत्वाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविली आहे. 

आसाम राज्यात १२६ विधानसभा क्षेत्र आहेत. २७ मार्च, १ एप्रिल व ६ एप्रिल या ३ टप्प्यात येथे निवडणूक पार पडणार आहे. छाननी समिती सर्व विधानसभा क्षेत्राचा अभ्यास करून संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय समितीकडे पाठविणार आहेत ज्या समितीच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत. आसाम राज्याची उमेदवार छाननी समिती जी नावे राष्ट्रीय समितीकडे पाठवतील त्या नावांचा विचार करून उमेदवार निवड निश्चिती केली जाणार आहे. 

काँग्रेस कडून पूर्वेत्तर राज्यांमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी तयारीच्या अनुषंगाने छाननी समिती महत्वाची भूमिका पार पाडेल.