उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या भिंतीमध्ये असलेल्या लिफ्ट मध्ये अडकलेल्या सापाला सर्पमित्रांकडून जीवदान देण्यात आले.
कोयना धरणाच्या भिंतीमध्ये कर्मचाऱ्यांना वर खाली ये जा करण्यासाठी असलेल्या लिफ्ट मध्ये तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना एक साप दिसला व सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे त्यांनी तात्काळ ही गोष्ट कोयनानगर येथील सर्पमित्र निखिल मोहिते यांना कळवली. ही गोष्ट कळताच निखिल मोहिते, विकास माने व अश्वजित जाधव हे त्याठिकाणी पोहचले. साप लिफ्ट मध्ये अडकला असल्यामुळे लिफ्ट बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे तब्बल 200 पायऱ्या उतरत भिंतीच्या आत असलेल्या 14 व्या मजल्यावर सगळे पोहचले. साप अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अवघड होते. साप बिनविषारी धामण या जातीचा असल्यामुळे निखिल यांनी हात घालून त्याला अलगत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण साप बाहेर आला नाही. त्यातच सापाच्या अंगाला लिफ्टचे ग्रीस लागल्यामुळे तो निसटत ही होता. नंतर साप हळूहळू खाली सरकू लागला व तो भिंतीतील सर्वात खालच्या तळघरात गेला. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा 4 मजले उतरून त्याला जावे लागले. नंतर विकास माने यांनी तळघरात उतरून साप बाहेर काढून निखिल यांच्याकडे दिला व त्याला सुखरूप एका पिशवीमध्ये पकडून सुरक्षित निसर्गात सोडण्यात आले.
सर्पमित्र अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सापांना वाचवण्याचे काम करत असतात पण कायद्याआडून त्यांना अनेक वेळा बोलले जाते. तसेच काही तोतया सर्पमित्रांकडून चुकीच्या पद्धतीने साप पकडून सापांना त्रास दिला जातो, तसेच साप पकडण्याच्या नावाखाली सामान्य जनतेकडून गरजेपेक्षा जास्त पैशाची उकळन केली जाते. हे सर्व थांबून सर्पमित्रांची कायदेशीर नोंदणी करण्यात यावी. तसेच एखाद्या घरात साप आला तर पहिल्यादा जवळच्या वनविभाग कार्यालयात फोन यावा, फोन केलेल्या व्यक्तीचे नाव, नंबर व पत्ता कार्यालयात नोंद करण्यात यावे व नंतर वनविभाग कार्यालयातुन नोंदणीकृत सर्पमित्रांना कळवण्यात यावं. तसेच पकडलेला साप त्याच दिवशी वनविभाग कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सोडण्यात यावा. यासारख्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्पमित्र 23 मार्च रोजी मुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांना निवेदन देणार आहेत. या मागण्यांचा 45 दिवसात विचार नाही केल्यास सगळीकडे काम बंद आंदोलन करण्यात येणार असून, येणारे सगळे फोन वनविभाग कार्यालयाला पाठवण्यात येणार आहेत. असे यावेळी सर्पमित्र विकास माने व निखिल मोहिते यांनी सांगितले.