जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश.


सातारा दि. 3 (जिमाका) : सातारा जिल्ह्याज कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात 4 मार्च पासून 31 मार्च 2021 रोजीचे 24.00 वा. पर्यंत पूढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. 

सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करण्यात येत आहे.

▪️ सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वा. पासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चाल राहतील.  

▪️ इयत्ता 9 वी पर्यंतच्या सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टीट्युट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टीट्यूट बंद राहतील. तथापि निवासी शाळा, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह, इयत्ता 10 वी व त्यापुढील वर्ग, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था चालू ठेवणेस परवानगी असेल,

▪️ ऑनलाईन/दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील.

▪️ऑनलाईन शिक्षण /दुरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षीततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील.

▪️ राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयमध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रामध्ये कौशल्य किंवा उदयोगकता प्रशिक्षण घेणेस परवानगी राहील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उद्योजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️ उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन, दुरस्थ शिक्षण प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी केवळ उच्च शिक्षण संस्था (पी. एच.डी) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील, प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील.

 ▪️केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाल्यानंतरच प्रयोगशाळा, प्रयोगात्मक कामांसाठी विद्यार्थ्यांना बोलावण्यास परवानगी राहील. 

▪️ इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे, इत्यादी ते केवळ संशोधन अभ्यासक (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील, प्रायोगिक कामासाठी परवानगी राहील. 

▪️ सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन काम करण्याची परवानगी राहील. 

▪️ यशदा, वनमती, मित्र, एमईआरआय इत्यादी विविध सरकारी ऑफलाईन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात उघडण्यास परवानगी असेल. संबंधित प्रशासकीय विभागामर्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. 

▪️रेल्वे व विमान प्रवासी वाहतुक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोस्युजर नुसार चालू राहील.

▪️ सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. 

▪️सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. 

सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील

▪️हॉटेल, फुड कोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बारर्स् यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमेने चालू ठेवण्यास परवानगी देत आहे, तथापी, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️ऑक्सीजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे.

▪️ राज्य व केंद्र शासनाने कोविड-19 बाबत ठरविलेलया राजशिष्टाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरुवात ते शेवट पर्यंत प्रवास मुभा राहील. 

▪️ सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 या वेळेमध्ये चालु राहतील. तथापि, मेडीकल, औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करावीत. ▪️सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी, वाढपी इ. सह) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करण्याकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच या कार्यालयाचे दि. 2 मार्च 2021आदेशामधील मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. 

▪️ अत्यंविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्य्क्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील.

▪️ वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात येत आहे (घरपोच वितरणासह). 

▪️बाग, उद्याने आणि करमणुकीच्या उद्देशाने सार्वजनिक मोकळ्या जागा चालु राहतील. 

▪️कन्टेनमेंट झोन बाहेर, व्यावसायाच्या अनुषंगाने प्रदर्शनास परवानगी राहील. त्यासाठी औद्योगिक विभागाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात स्थानिक साप्ताहीक बाजार (जनावरांसह) उघडण्यास परवानगी राहील. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️ रेल्वेने रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी व मुद्रांकन करण्याची आवश्यकता नाही. तथापी, कोविड-19 च्या अनुषंगाने या प्रवाश्यांनी सामाजिक आंतर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. 

▪️ केश कर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्या दि.27.6.2020 आदेशामधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

▪️ सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्या दि. 11.6.2020 आदेशामधील अटी व शर्तीन्वये चालु ठेवण्यास परवानगी राहील. 

▪️इनडोअर हॉल मधील खेळाच्या सुविधा चालु करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्या दि. 19.10.2020 मधील अटी व शर्तीन्वये चालु ठेवण्यास परवानगी राहील.

▪️ सातारा जिल्ह्यातील व्यायामशाळा चालू करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्या दि. 23.10.2020 मधील अटी शर्तीन्वये चालु ठेवण्यास परवानगी राहील. 

▪️सातारा जिल्ह्यातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पूर्णवेळ ठेवणेस परवानगी राहील.  

▪️राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिडापट्टुंच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रिडा व युवा व्यवहार विभागाकडून निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक राहील.

▪️ कन्टेमेंट झोन बाहेरील क्षेत्रात योग संस्था चालु करण्यास परवानगी राहील. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग भारत सरकाराच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभग यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (एसओपी)चे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेंज इ. मधील सर्व खेळांमध्ये शारिरीक व स्वच्छताविषयक पालन करुन चालु करण्यास परवानगी राहिल. 

कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, नाटक थिएटर हे बसण्याच्या 50 टक्के क्षमतेने चालू राहील. यामध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (एसओपी)चे पालन करणे बंधनकारक राहील.

▪️ सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे खुली करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्या दि. 4.11.2020 रोजीच्या आदेशामधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. 

▪️बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 5.11.2020 शासन निर्णया अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट, बोर्डाने, अधिकृत केलेल्या निर्णयानुसार कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्व समान्यांसाठी चालू करण्यात येत आहेत. तथापि, मुख्य सचिव महसुल व वनविभागा आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन यांच्याकडील दि. 14.11.2020 च्या आदेशान्वये निर्गमित केलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️ राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण संस्था व क्रीडा स्पर्धा, बैठक, खेळांचे आयोजन आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी विविध संस्थ यांना कन्टेनमेंट झोनच्या बाहेर काम करण्यास परवानगी असेल. यामध्ये राज्यातील विविध खेळांच्या स्पोर्टस् ॲकॅडमीचा समावेश असेल. तसेच क्रीडा व युवा कार्य विभागामर्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी)चे पालन करणे बंधनकारक राहील. 

▪️अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील. 

कोविड - 19 च्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पान न झाल्यास दंडात्मक, फौजदारी कारवाईस पात्र राहील

सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रु. दंड आकारावा. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु. दंड आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्येच एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी रु. 2000/- व शहरी भागासाठी रु. 3000/- दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यंत दुकान सक्तीने बंद करावे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी , लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 

कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर, याची एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंट वर व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. औद्योगिक व व्यावसायीक आस्थपना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलण्याच्या वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 

आरोग्य सेतू ॲपचा वापर: जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील. 

 मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांच्याकडील दि. 30.9.2020 मधील आदेशानुसार Annexure I मध्ये नमूद केलेल्या सूचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

 ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कन्टेनमेंट झोन जाहिर करण्याचे अधिकारी इन्सिडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. संबंधित कन्टेनमेंट झोनबाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोन मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील. हा आदेश कन्टेनमेंट झोन वगळता सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी लागू राहील तसेच कन्टेनमेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रा लागू राहतील. तसेच कन्टेनमेंट झोन इनॲक्टीव्ह झाल्यानंतर त्या क्षेत्रात इकडील आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने कन्टेनमेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोन मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील. 

 कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, या आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करुन किंवा नवीन आदेश पारीत करुन या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्या पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही. 

 या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, यांच्याकडील दि. 30.9.2020 च्या आदेशामधील Annexure III मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.