कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दीनदुबळ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. महाराजांनी केव्हाही जातीयवाद केला नाही. सर्वांना समानतेने वागविले. रयतेची कायमच काळजी घेतली. छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे,' असे मत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना व्यक्त केले.यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, पै नानासाहेब पाटील, शिवाजीराव मोहिते, विक्रांत जाधव, मोहनराव शिंगाडे, इंद्रजीत चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी तेथे कराडमधील शिवकन्या ग्रुप छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित होते. या ग्रुपमधील सदस्यांच्या सोबत पृथ्वीराज बाबांनी संवाद साधत त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढले.
पुढे आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, मोगलांकडून रयतेवर होणारे अन्याय, अत्याचार पाहून जनता यातून कशी बाहेर पडेल याचा राजमाता जिजाऊ सतत विचार करत होत्या. रयतेच्या कल्याणाचे स्वराज्य निर्माण करण्याचे संस्कार त्यांनी बाल शिवबाच्या मनात बिंबवले. हाच राष्ट्रभक्तीचा अंगार शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांमध्ये पेटविला. त्यातून एक असामान्य व अलौकिक स्वराज्य साकारले गेले.