पुस्तकांच्या शुभेच्छात सेवानिवृत्त होणारा अवलिया शिक्षक


तळमावले|डाॅ.संदीप डाकवे :
प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत अकौटन्सीचा प्राध्यापक ते अकौटन्सी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदावर काम केलेले शिक्षक म्हणजे प्रा.अधिकराव कणसे. 30 जनू, 2020 मध्ये ते आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचा सेवागौरव समांरंभ झाला नव्हता ही खंत त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्यांनी या काळात विविध मान्यवरांकडून त्यांच्या विषयीचे लेख मागवून ‘ज्ञानयात्री-गौरव ग्रंथ' तयार केला. आपल्याला घडवणारे शिक्षक आणि आपण ज्यांना घडवले असे विद्यार्थी नातेवाईक, सहकारी, प्राध्यापक, प्राचार्य यांच्या उपस्थितीत प्रा.कणसे सरांनी आपला सेवा गौरव समारंभ करण्याचे ठरवले. यावेळी प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, प्राचार्य आर.के भोसले. प्राचार्य डाॅ.राजेेंद्र शेजवळ, प्राचार्य एल.जी जाधव, अॅड.जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.जे.एस.पाटील, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, प्राचार्य डाॅ.जे.ऐ. म्हेत्रे, प्राचार्य डाॅ.सुभाष शेळके, डाॅ.महेश गायकवाड, प्राचार्य डाॅ.सतीश घाटगे, डाॅ.आर.जी.पाटील हे मान्यवर उपस्थित होते. त्याबरोबर कणसे सरांचा मित्रपरिवार, नातेवाईक, इतर महाविद्यालयातून आलेले व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सेवानिवृत्ती म्हटले की, शुभेच्छा द्यायला येणारे बुके, पोषाख, शाल, श्रीफळ व अन्य भेट वस्तू घेवून येतात. हे कणसे सरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या गोष्टीला फाटा देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी निमंत्रितांना पाठवलेल्या डिजीटल पत्रिकेत एक जाहीर टीप टाकली. ती म्हणजे ‘‘कार्यक्रमाला येताना बुके आणू नयेत आणावयाचेच असेल तर एखादे पुस्तक आणावे ही विनंती.’’ या विनंतीला मान देत लोकांनी पुस्तके आणली. जवळपास 200 पेक्षा जास्त दर्जेदार व विविध स्वरुपाची पुस्तके या कार्यक्रमात जमा झाली. सदर पुस्तके एखाद्या ग्रंथालयाला देण्याचा मानस प्रा.अधिक कणसे यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे म्हणाले, ‘‘लोक मैत्रीच्या वेलीवरती उमललले सुंदर फुल म्हणजे प्रा.अधिकराव कणसे. मैत्रीचा आदर्श हा कणसे सरांनी आपल्या समोर ठेवला आहे. कणसे सरांना सर्वजण ‘आबा’ म्हणतात. आबा हा माणूस जोडणारा व्यक्ती आहे. आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसून आपण काय होतो व भविष्यात आपण काय झालो हे महत्त्वाचे आहे. तळमावलेच्या मातीने अनेकांना संजीवनी दिली. त्यातीलच एक मोलाचे रत्न म्हणजे  कणसे सर आहेत. विद्यार्थीदशेत निराधार असलेले आबा आपल्या कष्टातून उभे राहिले. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या तत्त्वांचे उपयोजन झाले पाहिजे कणसे सरांनी या तत्वांचे पालन आपल्या सेवा काळात घडवले. अनेक आदर्श विद्यार्थी घडवले.’’
प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले, ‘‘आयुष्यातील प्रत्येक भूमिका कणसे सरांनी निभावली. कणसे सरांनी आयुष्याच्या जमाखर्चात खूप माणसे मिळवली. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे खाते समृध्द झाले आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुरेखा कणसे यांना हार्दिक शुभेच्छा देतो.’’
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रो.डाॅ.सतीश घाटगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. या सेवा गौरव समारंभात कणसे सरांच्या आयुष्यातील विविध आठवणींचा संचय असलेल्या ज्ञानयात्री या पस्तकाचे संपादक डाॅ.संदीप डाकवे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी पुस्तकात लेख लिहलेल्या सर्व लेखकांचा कणसे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रा.अधिक कणसे सर म्हणाले, ‘‘आपल्या सर्वांचे प्रेमाने मी तृप्त झालो आहे. गरीबीत मित्रांची साथ मिळाली. त्यामुळे मी उभा राहिलो. माझ्या आईचे संस्कार मोलाचे आहेत. त्यामुळेच मला यशस्वी पाऊल टाकता आले. शिक्षण महर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला माझा जीवन प्रवास यशस्वी करता आला.’’
शुभेच्छा देताना आणलेल्या वस्तू, बुके, तशाच पडून राहतात. परंतू आणलेले पुस्तक हे देणारा आणि घेणारा या दोघांच्याही कायम लक्षात राहते. यामुळे विचारांची देवाणघेवाण होते हा हेतू आपला साध्य झाला असल्याचे प्रा.कणसे यांनी सांगितले आहे.

महाविद्यालयात सुरु असलेल्या वाचन उपक्रमात छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या लेखाचे वाचन प्रा.विनायक जाधव यांनी केले. दरम्यान उपप्राचार्य मोहन पाटील, प्रा.पी.डी.पाटील, सरांची नात अनुष्का देसाई, प्राचार्य डाॅ.जे.एस.पाटील, शरद चव्हाण, प्राचार्य बी.बी.सावंत, बाळासाहेब पाटील, शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता ए.एम.गुरव यांनी आपली मनोगते व्यक्त केली व कणसे कुटूंबियांना शुभेच्छा दिल्या.
प्रा.कणसे यांनी आपल्या सेवाकाळात अनेक गरजू विद्याथ्र्यांच्या अडचणी सोडवल्या आहेत. तसेच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यांना विविध संघटनांनी पुरस्कार देवून गौरवले आहे. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
विद्यार्थी दशेपासूनच पुस्तकांच्या कायम व्यासंगात असणारे कणसे सर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमातही पुस्तकांच्या शुभेच्छांमध्ये रंगले. कणसे सरांना पुस्तकांच्या शुभेच्छांत सेवानिवृत्त होणारा हा अवलिया शिक्षक असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुरेश यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.आण्णासाहेब पाटील यांनी केले.