लाॅकडाऊनमध्ये ‘पाण्या’ने जगवले

 


तळमावले|डाॅ.संदीप डाकवे :
पाणी हेच जीवन. पाण्याशिवाय सजीव प्राणी जगू शकत नाही. याच पाण्याने लाॅकडाऊनमध्ये दोन कुटूंबाला सावरले. आणि अनेकांची ‘तहान’ देखील भागवली. पाण्याच्या व्यवसायात उडी मारत ‘पुण्याई’ च्या कामाबरोबर ‘त्या’ दोन तरुणांनी आपल्या कुटूंबाला जगवले. त्याबाबत अधिक माहिती अशी ...

अधिकराव आनंदा पाचुपते आणि संतोष बाबासो कोळगे रा.कोळगेवाडी ता.पाटण, जि.सातारा येथील या दोन युवकांनी लाॅकडाऊनमध्ये आपल्या करियरला नवीन दिशा देणारे पाऊल उचलले असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. दोघांच्याही घरची परिस्थिती पाहिली तर तशी जेमतेमच. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून दोघांनी चांगले शिक्षण घेतले. संतोष कोळगे याने वाणिज्य शाखेतील पदवी घेतली तर अधिक पाचुपते यांने बी.ई.(इलेक्ट्राॅनिक अॅन्ड टेली कम्युनिकेशन्स) ही पदवी घेवून कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली. दोघांनीही आपापल्या कामाच्या ठिकाणी इमाने इतबारे नोकरी करुन आपल्या कुटूंबाचा गाडा हाकू लागले. आपल्या कुटूंबाला सावरु लागले.

23 मार्च, 2020 ला संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला आणि या दोघांनी भविष्यात पाहिलेली स्वप्ने देखील ‘लाॅक’ झाली. दोघेजण आपल्या मातीकडे म्हणजे गावाकडे आले. महिन्यागणिक लाॅकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने या दोन युवकांच्या मनाची घालमेल आणि बैचेनी वाढू लागली. अशा परिस्थितीनंतर दोघांनीही मुंबईला न जाता गावीच कोणत्याही व्यवसायात उतरण्याचे ठरवले. यासाठी मनाची तयारी केली. प्रचंड मेहनत करण्याची देखील मनाशी गाठ बांधली.परंपरागत व्यावसायामये न उतरता दोघांनी ‘हटके’ क्षेत्र निवडले. यासाठी दोघांनी परिसराचा, बाजारपेठेचा अभ्यास केला. लोकांच्या जीवनाचा आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा घटक म्हणजे पाणी. पाण्याची एजन्सी घेण्याचा मार्ग या दोघांनी घेतला. प्रचंड कष्टाची सवय असलेल्या या दोघांनी मग विविध ठिकाणच्या पाण्याच्या प्रकल्पाला भेटी देण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातील अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि या व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’ केला.

जानेवारी 2021 पासून त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. त्यांनी यासाठी पाणी पुरवण्याची फ्रंचाईजी घेतली. मुंबईवरुन त्यांनी थेट खरेदी करुन ते आणून विक्री करण्यास सुरुवात केली.

हॅाटेल, विविध ठिकाणी प्रत्यक्ष जावून त्यांनी आपला माल देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दोघेही प्रतयक्ष बाजारपेठा मध्ये फिरत असतात. मिनरल वाॅटर बाटल्यांचे बाॅक्स वितरित करण्यासाठी त्यांनी एक टेम्पो भाड्याने घेतला आहे. या टेम्पोच्या माध्यमातून सरासरी 80 ते 100 बाॅक्स दररोज वितरित करतात. लोकांचा चांगला प्रतिसाद याला मिळत आहे. यामुळे त्यांचा उत्साह दुणावत आहे. आपल्या भागातील युवक व्यवसायात उतरत आहेत हे पाहून लोकांनी देखील त्यांना ‘सपोर्ट’ केला आहे.

‘ब्लू थंडर’ या नावाची कंपनी आम्ही रजिस्टर केली असून त्याची प्रक्रिया सुरु आहे असे दोघांनी सांगितले. भविष्यामध्ये स्वतःची कपंनी सुरु त्या माध्यमातून उत्पादन सुरु करण्याचा विचार आहे. तसेच यामध्ये विभागातील तरुणांना संधी देवून रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नोकरीच्या अनुभवापेक्षा हा अनुभव खूप वेगळा आहे. यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठ कशी आहे हे समजते. नोकरीतील मानसिक तणाव यामध्ये जाणवत नाही. आनंदाने व्यवसायात सहभगी होत असल्याची प्रतिक्रिया अधिक व संतोष यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

याशिवाय दोघेही गावाच्या विकासासाठी मेहनत घेत आहेत. यासाठी ते स्वतः प्रवास करुन शासकीय अधिकारी, सरकारी यंत्रणा व संबंधित लोकांना भेटत आहेत. गावात पाण्याची सोय, रस्ता, नाले व अन्य कामांसाठी ते आग्रही आहेत.

व्यवसायामध्ये झोकून दिल्यास यश मिळतेच असा अनुभव अधिक व संतोष यांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही ते आपल्या कष्टाने त्यांच्या या व्यवसायात ‘अधिक’ मेहनतीने ‘संतोष’ मिळवत कुटूंबांना प्रगतीकडे नेतील यात शंकाच नाही. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

----------------------------------------------------------------------------

बाटलीवर फर्म चे नांव:

पाण्याच्या बाटलीची जास्त मागणी असल्यास त्यावर ग्राहकाच्या फर्म, व्यवसायाचे नाव टाकून देण्याची संकल्पना ही आम्ही राबवत आहोत. यामुळे लोकांना सदरचा बॅ्रंड आपला वाटेल असे अधिक आणि संतोष यांनी सांगितले आहे.

नोकरीपेक्षा व्यवसायात यावे :

तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरावे असे मत या दोघांनी व्यक्त केले आहे. सुरुवातीच्या काळात व्यवसायासाठी मेहनत घेतल्यास भविष्यात चांगले दिवस येतील असे ही मत या दोघांनी व्यक्त केली आहेत.