५४ वा वार्षिक संत निरंकारी समागम २६ फेब्रुवारीपासून " व्हर्च्युअल ' रुपात


मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा यंदाचा ५४ वा वार्षिक निरंकारी संत समागम २६, २७ व २८ फेब्रुवारी रोजी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आला आहे.

मिशनच्या सेवादारांकडून मागील दीड महिन्यापासून या संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मोठ्या भक्तीभावाने व समर्पणाने संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर, मुंबई येथे केली जात आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात समागमात भाग घेणारे वक्ता, गीतकार, गायक, कवि, संगीतकार तसेच वादक यांनी अगोदरच या भवनमध्ये येऊन आपल्या प्रस्तुती सादर केलेल्या असून व्हर्च्युअल रूपात प्रसारण करण्यासाठी त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातील तसेच जवळपासच्या राज्यातील आणि देश-विदेशातील कित्येक वक्त्यांनी या समागमामध्ये भाग घेतला आहे. 

समागमाच्या पूर्वतयारी दरम्यान कोविड संदर्भात सरकारकडून देण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंग, मास्क परिधान करणे, सॅनिटाईजेशन इत्यादि काळजी घेण्याबरोबरच समागम सेवांमध्ये संलग्न आणि कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिनिधींची कोविड चाचणीही करण्यात आली. 

 मिशनच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ५४ वा वार्षिक निरंकारी संपूर्ण समागमाचे व्हर्च्युअल प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर २६, २७ व २८ फेब्रुवारी रोजी प्रस्तुत करण्यात येईल. याशिवाय, हा समागम संस्कार टी.व्ही चॅनलवर तिन्ही दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रसारित केला जाईल.