मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कांद्याचे भाव वाढत चाललेले दिसत आहेत .अवकाळी पावसामुळे कमी उत्पादन झाल्याने वाशीतील घाऊक बाजारपेठेत कमी आवक झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती उदभवली आहे .मात्र पुढील १५ दिवसांत कांद्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे .कारण लवकरच नवीन कांदा मार्केटमध्ये दाखल होणार आहे.
सध्या दिल्लीत कांद्याची किंमत ६० रुपये किलोवर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात ३५ ते ४० रुपये दर आहे.त्यामुळे महागाईच्या या काळात कांदा आता १०० ते १५० रुपये होणार तर नाही अशी भीती ग्राहकांना सतावत आहे. पण यावेळी असे होणार नाही. कारण, १५ दिवसांतच मार्केटमध्ये नवीन कांदा दाखल होऊ शकतो. खरेतर, देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन हे महाराष्ट्रात होते. नाशिक, पुणे, धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लागवड कांद्याची केली जाते. कांदा लागवडीचे तीन हंगाम आहेत. पहिला खरीप आणि दुसरा व तिसरा रब्बी हंगाम असतो. एकूण उत्पादनापैकी ६५ टक्के कांदा रब्बी हंगामात पिकवला जातो. म्हणून तिसर्या हंगामातील कांदा अजून येणार आहे. रब्बी हंगामातील कांदा बाजारात येणार असून भावही कमी होतील असे सांगितले जात आहे.