प्रामाणिकपणाबद्दल पोपट माने यांचा ‘स्पंदन’तर्फे सत्कार


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :

घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर आपणांस कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा चोरी झाल्याच्या घटनाही दिसून येतात. अशावेळी आय फोन कंपनीचा 40 हजाराचा पडलेला मोबाईल मुळ मालकाला देवून प्रामाणिकपणाचे उदाहरण मान्याचीवाडी (कुंभारगांव) येथील पत्रकार पोपट माने यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. याबद्दल त्यांचा डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने शाल, पुस्तक, आणि दिनदर्शिका देवून विशेष गौरव करण्यात आला. या अनोख्या सत्कारप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, संजय सावंत, परशराम जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

काही दिवसापूर्वी पत्रकार पोपट माने हे आपल्या वैयक्तिक कामासाठी कराडला जात होते. त्यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ त्यांना मोबाईल सारखी वस्तू पडलेली दिसली. नीट पाहिले असता तो आयफोन कंपनीचा मोबाईल असल्याचे कळले. तेथील उपस्थितांमध्ये याबददल चैकशी केली असता तो कोणाचा नव्हता. त्यानंतर शहानिशा करुन सदर मोबाईल पोपट माने यांनी मुळ मालकाला परत केला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्याच्या महागाईच्या युगात अशाप्रकारचा प्रामाणिकपणा जपणारी माणसं कमी आहेत. या प्रामाणिपणाचा आदर्श इतरांनी घ्यावा. तसेच त्यांना आपल्या कृतीबद्दल अभिमान वाटावा यासाठी स्पंदन ट्रस्ट च्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल पोपट माने यांनी स्पंदन ट्रस्टचे आभार मानले आहेत.