मंद्रुळकोळे चा आकाश पाटील मालिकेत

तळमावले|डाॅ.संदीप डाकवे :

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी नजीक असलेल्या मंद्रुळकोळे या गावातील आकाश प्रशांत पाटील हा युवक ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत काम करत आहे. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रदर्शित होत आहे. या मालिकेतील ‘तुषार’ नावाची व्यक्तिरेखा आकाश पाटील साकारत आहे. त्याच्या या भूमिकेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

आकाश पाटील हा मुळचा मंद्रुळकोळे येथील असणारा हा युवक वतनावरती सळवे या गावी गेला आहे. आकाश याचे प्राथमिक शिक्षण आबासाहेब चिरमुले प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे, महाविद्यालयीन शिक्षण वायसी काॅलेज येथे झाले आहे. आकाशने बी.ई.मेकॅनिकल ही पदवी ज्ञानश्री इंजिनिअरींग काॅलेज सातारा येथून घेतली आहे. घरामध्ये कलेची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना टेलिव्हीजनच्या चंदेरी दुनियेत आकाश आपली वाट मोठया कष्टाने चालत आहे. शालेय जीवनापासूनच त्याला या क्षेत्राचे वेध लागले होते. शाळेत असताना गॅदरींग, छोटे मोठे कार्यक्रम यामध्ये आकाश सहभागी होत असे. पुढे महाविद्यालयीन जीवनात या आवडीला पाठबळ मिळाले. काॅलेजमधील विविध कलागुण दर्शनाचे कार्यक्रम, गॅदरींग या मधून आकाशने आपल्यातील कलेला वाव दिला. यासाठी खरंतर त्याला मुंबई येथील रुपारेल रुईया या काॅलेजला अॅडमिशन घ्यायचे होते परंतू ते शक्य झाले नाही.

या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली असे आकाशला विचारले असता, तो म्हणाला, ‘‘काॅलेजला असताना एकदा मी नाटक पाहिले होते. ते नाटक पाहून आपणही अशाप्रकारे काम करावे अशी भावना मनात निर्माण झाली. त्यानुसार तशाचप्रकारचे नाटक महाविद्यालयातील मित्रांना घेवून ते सादर केले ते चांगले सादर झाल्याने या क्षेत्रातील आवड वाढली’’. यानंतर आकाश नाटयक्षेत्रात मिळेल त्या ठिकाणी छोटी मोठी कामे करत राहिला. सातारा येथील कलाप्रेमी मित्रांचा ग्रुप बनवून त्यांच्या माध्यमातून काम करत राहिला. इंजिनिअरींग ला असताना आकाश मित्रांना सोबत घेवून नाटके बसवून ती सादर करायचा. नंतर हळू हळू या क्षेत्रात संधी मिळत गेल्या.

काॅलेजला असतानाच राजीव मुळये यांनी दिग्दर्शित केलेले दोन अंकी ‘बैल’ या प्रायोगिक नाटकामध्ये काम करण्याची संधी आकाशला मिळाली. या संधीचे त्याने सोने करत आपल्या कामाची छाप उमटवली. यानंतर अनेक एकांकिका, नाटक, एकपात्री प्रयोग यामधून काम करण्याची संधी मिळाली. बी.ई मेकॅनिकल पूर्ण झाल्यानंतर जाॅब करत अनेक ठिकाणी कामे केली. आकाशला कलेची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

सातारा येथील प्रसिध्द दिग्दर्शक जमीर आतार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गाव लय झ्याक’ या वेबसिरीजमध्ये आकाशने काम केले. ही वेबसिरीज प्रचंड गाजली यामधील त्याची भूमिकाही लोकांच्या पसंतीस आली. या वेबसिरीजने आकाशच्या कलाक्षेत्रातील पुढील करियरला वेगळी दिशा निर्माण करुन दिली. या वेबसिरीजमधील भूमिकेने आकाशला ‘टकाटक’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांने मुख्य कलावंत प्रथमेश परब यांच्या मित्रांची भूमिका साकारली आहे. त्यानंतर सुप्रसिध्द अभिनेते विक्रम गोखले यांच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामुळे त्याला अनेक नामवंत कलावंतांचा सहवास मिळाला. त्यांच्या काम करण्याच्या पध्दती अनुभवता आल्या.  त्यानंतर ‘धुरळा’ या सुप्रसिध्द मराठी चित्रपटासाठी त्याचे आॅडीशन झाले होते. परंतू त्याच्या वडिलांची तब्बेत बरी नसल्याने यात आकाशला काम करता आले नाही.

नोकरी सांभाळत आकाश आपल्या कलेची भूक भागवत होता. घरची कौटुंबिक जबाबदारीही त्याच्यावर अवलंबून असल्याने नोकरीदेखील त्याच्यासाठी महत्त्वाची होती. लाॅकडाऊनच्या काळात त्याने त्याच्या अपूर्ण राहिलेल्या वेबसिरीजवर काम केले. शासनाच्या कोरोनाविषयक व अन्य जाहिरांतीचे काम देखील त्याने या काळात केले.

सातारा येथील सयाजी शिंदे, बाबा शिंदे, जमीर आतार, मकरंद गोसावी, राजीव मुळये, लढढा सर, विजय निकम हे त्याच्या कलाक्षेत्रातील जीवनाचे मार्गदर्शक आहेत. आकाश त्याची आई सुमती पाटील यांना गुरु मानतो. वडील प्रशांत उत्तमराव पाटील यांनी देखील आकाशला खूप मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले आहे. तसेच अडचणीच्यावेळी मावशी, मामा यांनी मला आणि माझ्या कुटूंबाला खुप मदत केली आहे. या सर्वांची आकाशला वेळोवेळी मदत झाली आहे. सयाजी शिंदे यांना ज्या ज्या वेळी भेटतो त्या त्या वेळी त्यांच्याकडून नवीन काहीतरी शिकतो अशी प्रतिक्रियाही आकाशने दिली आहे.

सध्या  आकाश पाटील हा ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिकेत काम करत आहे. जामखेडकर परिवारातील एक सदस्य म्हणून तो आपली भूमिका खूप छानपणे निभावत आहे. त्याने साकारलेला काॅलेजमधील तुषार नावाचा युवक अगदी भन्नाट आहे.

मालिकेत काम करत असलेल्या आकाशला नाटक, थिएटर मध्ये काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. सध्यातरी त्याला असे काम नसल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली आहे.

कलेची आवड, प्रामाणिकपणा, कामाबद्दल आदरभाव असल्याने आकाश पाटील त्याच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होईल. आकाश पाटील याच्या रुपाने ढेबेवाडी विभागाला चंदेरी दुनियेतील आणखीन एक चमचमता तारा पाहावयास मिळत आहे. तो याहूनही पुढे जाईल यात शंकाच नाही. आकाशच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा..!