मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा : "तालुका सुंदर गांव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव. पाटण तालुक्यातील या छोट्याशा गावाने आज पर्यंत केंद्र व राज्यातील तब्बल 54 पुरस्कार पटकावले आहेत. आजच्या या पुरस्काराने ही गौरवशाली परंपरा अखंडितपणे सुरू राहिली आहे. या नव्या पुरस्काराने पुरस्काराच्या शिरपेचात आणखी एका पुरस्काराची भर. नव्या विक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ सज्ज. तालुक्यात सर्वत्र या गावाचे कौतुक.

 सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. या योजनेतून तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासह दहा लाख रुपये निधी देऊन गावाला गौरविण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी  11 वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती श्री. फडतरे यांनी दिली.

गेल्या वीस वर्षांपासून पुरस्कार मिळत असलेल्या मान्याचीवाडी गावला आत्तापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून तब्बल 54 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ग्रामविकासात राज्यातील गावांनी योगदान दिल्यास महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्शवत खेडी निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी गावोगावच्या सरपंचांनी पुढाकार घ्यावा.- रविंद्र माने - सरपंच आदर्श गाव मान्याचीवाडी.



 11 ग्रामपंचायतींना "तालुका सुंदर गांव"  म्हणून घोषित.

 आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत  सातारा जिल्ह्यातील धामणेर ता. कोरेगांव या ग्रामपंचायतीस सन 2018-19 मधील “जिल्हा सुंदर गांव” म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर सन  2019-20 मधील “तालुका सुंदर गाव” म्हणून अपशिंगे (मि.) ता. सातारा, शिरंबे ता. कोरेगांव, नागनाथवाडी ता. खटाव, गोंदवले खुर्द ता. माण, काळज ता. फलटण, गुठाळवाडी ता. खंडाळा, चांदवडी पुनर्वसन ता. वाई, चोरांबे ता. जावली, मांघर ता. महाबळेश्वर, गमेवाडी ता. कराड व मान्याचीवाडी ता. पाटण  या  11 ग्रामपंचायतींना घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.