दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा



मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होतंय. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

आता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केलीय. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. 12 वी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल आणि 10 वी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.