अर्णब गोस्वामी विरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : रिपब्लिक चॅनलचे संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सॲप चॅट लीक होताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसने अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रिपब्लिक टीव्ही चॅनलच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने प्रचंड निदर्शने केली. त्यापूर्वी मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली जांबोरी मैदान ते कमला मिल कंपाउंडपर्यंत काँग्रेस पक्षाने मोर्चा काढला होता. "बीजेपीचा दलाल अर्णब गोस्वामीला अटक करा"अशा आशयाचे पोस्टर्स वरळी जांबोरी मैदान ते परेलच्या कमला मिलपर्यंत लावण्यात आले होते.

जांबोरी मैदान ते कमला मिल कंपाऊंड या मार्गावरील मोर्चात काँग्रेसचे किमान पाच ते दहा हजार कार्यकर्ते सामील झाले होते. त्याआधी संपूर्ण मार्गावर अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात पोस्टर्स लावले होते. त्यावर लाल शाईने क्रॉसही मारला होता. "गली गली मे शोर है अर्णब गोस्वामी चोर है, गोस्वामी कौन है बीजेपी का दलाल है, अर्णब गोस्वामी कौन है, देश का गद्दार है, अर्णब गोस्वामी को अटक करो, अर्णब के गुनाहो का नरेंद्र मोदी जबाब दो, अमित शहा जबाब दो, "अशा घोषणा देत हे मोर्चेकरी रिपब्लिक चॅनलचे कार्यालय असलेल्या कमला मिल कंपाउंडपर्यंत आले. तिथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलिसांनी हा मोर्चा कमला मिल बाहेर अडविला. नंतर काँग्रेस पक्षातर्फे सभा घेण्यात आली. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, चरणसिंह सप्रा, नितीन पाटील, भूषण पाटील आदींची भाषणे झाली. 

यावेळी बोलताना आमदार भाई जगताप यांनी सांगितले की, अर्णव गोस्वामी या गद्दाराला जनतेचा राग दाखविण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला. बालाकोट सर्जिकल स्ट्राइक होण्याच्या तीन दिवस आधी त्याची माहिती अर्णब गोस्वामी याला कशी मिळाली? यावर भाजपा गप्प का आहे? पंतप्रधान आणि अमित शहा यावर खुलासा का करत नाहीत? अर्णब गोस्वामी ला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.